अडथळय़ांची शर्यत

206

बाळ तोरसकर,[email protected]

धावणे… सर्वांगसुंदर… परिपूर्ण व्यायाम… धावण्याच्या या क्रीडा प्रकारात अडथळे पार करणं मोठं रंजक असतं…

मनुष्य पुढे जावा म्हणून नेहमीच प्रयत्न करतो किंवा त्याला तशी मदत केली जाते. मराठी मनुष्य एखाद्याला पुढे जाण्यासाठी मदत करत नाही म्हणून त्याला खेकडय़ाची उपमा दिली जाते. असे असले तरी राजरोसपणे धावणाऱया खेळाडूच्या टप्प्यात मध्येमध्ये अडथळे ठेवले जातात व खेळाडूसुद्धा हे अडथळे पार आनंदाने करून कोणतीही तक्रार न करता ही शर्यत पूर्ण करतो. ती स्पर्धा म्हणजे अडथळ्यांची शर्यत. हो, या स्पर्धेलाच नाव आहे अडथळ्यांची शर्यत! इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथेलेटिक्स फेडरेशनच्या अधिपत्याखाली 110, 200 व 400 मीटर्सच्या म्हणजेच 120, 220 व 440 यार्डस्च्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धा अतिशय प्रेक्षणीय असतात. स्पर्धक हर्डलवरून उडय़ा मारताना अतिशय विहंगम दृष्य आपणांस पाहायला मिळते. अस असले तरी स्पर्धकाला मात्र विविध तंत्रांचा वापर करावा लागतो व आपले कसब सिद्ध करावे लागते. अडथळे पार करताना स्पर्धकाला दहावेळा उडय़ा माराव्या लागतात. त्यामुळे तुम्ही योग्य व नियमित सराव करत नसाल तर मात्र मांडय़ा व पाय हमखास दुखावतील. या स्पर्धेत उंच, चपळ, कसदार व सशक्त खेळाडू नेहमीच छाप पाडतात.

या प्रकारच्या स्पर्धेत नेहमीप्रमाणे धावावे तर लागतेच, शिवाय त्याला अडथळेसुद्धा पार करावे लागतात. यात स्टार्ट, पहिल्या हर्डलपर्यंत धावणे, हर्डलवरून उडी मारणे, पुन्हा दोन हर्डलच्या मध्ये धावणे हर्डल पार केल्यावर अतिशय जोराने धावत शर्यत पूर्ण करणे हे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामुळेच हे टप्पे पार करताना खेळाडू व ते दृष्य अतिशय विहंगम दिसते. जसे 100 मीटर स्पर्धेत खेळाडू बंदुकीतून गोळी सुटावी तशी धावत सुटतात तसा प्रकार या अडथळ्यांच्या शर्यतीत करता येत नाही. या प्रकारात धावताना सुरुवात मीडियम, बुलेट किंवा इलॉन्गेटेड यापैकी कोणत्याही एका पद्धतीने करावी लागते. यात प्रत्येक खेळाडूने आपापल्या पट्टय़ातून धावावे लागते. दहा अडथळे पार करताना 110 मीटर शर्यतीत 13.72 मीटरवर पहिला अडथळा असतो तर त्यानंतर प्रत्येक अडथळा 9.14 मीटरवर अंतरावर असतो. शेवटच्या अडथळ्यापासून अंतिम रेषा 14.02 मीटरवर असते. साधारणपणे पाच-सहा-सात पावले धावत जाऊन पहिला अडथळा पार करावा, जेणेकरून स्पर्धक शर्यतीत आपले लक्ष्य नीट गाठू शकतो. विमान जसे टेकऑफ व लॅंडिंग करते त्याप्रमाणे खेळाडूने प्रत्येक अडथळे पार करताना सुरुवातीला टेकऑफ घ्यावा व अडथळ्यावरून उडी मारावी. त्यानंतर लॅंडिंगसारखी पोझिशन घेऊन पार करावी.

खरं तर अडथळ्याच्या मागून साधारणपणे दोन मीटरवरून एक पाय जमिनीवर आपटून जोरात व वेगाने उडी मारत पुढे जात अडथळा पार करावा, जेणेकरून पुढचा टप्पा पार करणे सहज शक्य होईल. साधारणतः जो पाय अडथळ्यावर पुढे असतो तो पाय अडथळ्याच्या पुढे साधारणपणे दीड मीटरवर पुढे पडतो. त्यावेळी हवेत असताना त्या पायाच्या विरुद्ध हात पुढे व त्याबाजूचा हात मागे ठेवावा, जेणेकरून पाय जमिनीवर पडताच जोरात धाव घेणे सहज शक्य होते. अडथळा पार करताना मारलेली उडी खूप उंच असू नये. ती साधारणपणे हर्डलच्या वर दहा सेंटिमीटर वरून मारलेली असावी. म्हणजे स्पर्धकाला धावण्याची गती कायम ठेवायला सोपे होईल. खेळाडूने नेहमीच हे लक्षात ठेवायला हवे की, उडी मारून जमिनीवर आल्यावर आपली शारीरिक चाल धाव घेण्यासाठी उपयुक्त होईल असे ठेवावे व पटकन धाव घेऊन पुढची हर्डल लवकर पार करता येईल. या हर्डलची उंची 1.07 मीटर्स, 84 सेंटिमीटर्स व 76 सेंटिमीटर्स इतकी असते. हवेत असताना आपले शरीर धावण्याच्या स्थितीत ठेवण्यासाठी बराच सराव करण्याची गरज असते. शेवटची हर्डल पार केल्यावर जोराने धावत स्पर्धा पूर्ण करावी. या स्पर्धेत आपण आपले वर्चस्व राखण्यासाठी व आपली छाप नेहमीच ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच सरावावर भर द्यावा लागतो.

यासाठी खेळाडूने उत्साहवर्धक हालचाली करून आपले शरीर तापन करावे. विविध व्यायाम करताना ते आपणांस अडथळ्यांच्या शर्यतीला उपयोगी पडतील याची काळजी घ्यावी. उदा. एक पाय हर्डलवर ठेवून दुसऱया विरुद्ध हाताने त्या पायाचा अंगठा पकडण्याचा व तसेच विरुद्ध हात व पायाने करण्याचा व्यायाम करावा. त्याच बरोबर दोरीवरील उडय़ा मारणे, लांब उडय़ा मारणे, उंच उडय़ा मारणे, कमरेचे व पायाचे विविध व्यायाम करणे, धावणे, सायकलिंग करणे, झाडावर चढणे, लंगडी घालणे व त्याचवरोबर शरीरास लवचिकता येण्यासाठी वेगवेगळी योगासने करणे. त्याचबरोबर हाताने पायाचे अंगठे पकडणे आदी प्रकार नियमित केल्यास खेळाडूला नक्कीच फायदा होईल. जरी आपल्याला प्रत्येकाला अडथळ्यांची शर्यत धावता येणे शक्य नसले तरी यातील व्यायाम प्रकार करून सामान्य मानवाला आपले शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे सहज शक्य होईल.

आपली प्रतिक्रिया द्या