महाबळेश्वर हादरले! मुलासमोर पत्नीवर सपासप 25 वार, स्वत:लाही संपवले

सामना प्रतिनिधी । महाबळेश्वर

पत्नीची हत्या आणि पतीची आत्महत्यामुळे महाबळेश्वरात एकच खळबळ माजली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील अनिल सुभाष शिंदे (वय 34) याने पत्नी सिमा अनि शिंदे (वय 30) हिचा गळा चिरून व पोटावर व पाठीवर धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्या केली. हा सर्व प्रकार अनिलचा 11 वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर घडला.

बुधवारी अनिल (रा. वडार सोसायटी ऑफिस जवळ, विश्रांत वाडी, धानोरी पुणे) हा आपली पत्नी व मुलगा यांच्यासह महाबळेश्वर येथे फिरायला आला होता. सुभाष चौकाजवळील एका लॉजमध्ये त्याने राहण्यासाठी 204 क्रमांकाची खोली घेतली. शहर व परिसरात थोडे फिरल्यानंतर रात्री जेवण करून ते आपल्या रूमवर आले. रात्री एकच्या सुमारास एका महिलेच्या किंचाळण्याने परिसरातील शांतात भंग पावली हॉटेल मधील व्यवस्थापक आणि मालक हे महिलेल्या आवाजाच्या दिशेने धावले. 11 वर्षाच्या मुलाने रूमचा दरवाजा उघडला आणि जे चित्र दिसले ते पाहताच दोघांच्या अंगाचा थरकाप उडाला.

खोलीत दाम्पत्य रक्ताच्या थारोळयात पडले होते. मालकाने त्यांच्या 11 वर्षांचा मुलाला बरोबर घेतले आणि घटनेचे गांभिर्य ओळखून तातडीने पोलीस ठाणे आणि रूग्णवाहीका यांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच सहा पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड हे आपल्या पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या दोघांना उचलून ग्रामिण रूग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

मृत अनिलचा मुलगा आदित्य याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री तो झोपला असताना एकच्या दरम्यान दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणातूनच रागाने अनिलने आपल्या पत्नीचा गळा चिरला. पत्नीने आरडा ओरडा सुरू केला तेव्हा आदित्य उठला आणि तोमध्ये पडला. आईला मारू नका अशी विनवणी त्याने आपल्या पित्याला केली परंतु अंगात राक्षस संचारलेल्या अनिलने मुलाचे काहीही ऐकले नाही रक्ताच्या थारोळयात पडलेल्या पत्नीच्या पोटावर व पाठीवर तो धारधार शस्त्राने सपासप वार केले. त्याचा राग इतका अनावर झाला होता की या रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर सुमारे 25 पेक्षा अधिक वार केले. पत्नी ठार झाल्याची खात्री पटताच त्याने त्याच शस्त्राने आपल्या पोटावर सपासप आठ ते नऊ वार करून आत्महत्या केली.

पोलिसांनी दोघांचे आधार ओळखपत्र घेतले होते. त्या वरून दोघांची ओळख पटली. अनिलचा मुलगा आदित्य याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपला मामा अनिल पवार यांचा मोबाईल नंबर दिला. पोलिसांनी अनिल पवार यांचेशी संपर्क साधला आणि घटनेची माहीती दिली तसेच मुलाच्या घरीही कळविले. गुरुवारी ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पो. नि. दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सातारा येथील गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस अधिकारी व ठसे तज्ञ फॉरेन्सीक लॅब तज्ञ यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

अनिल हा एका खाजगी कंपनीत चालक म्हणून काम करीत होता. त्याला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये होती. आदित्य हा धाकटा तर मुलगी थोरली आहे. मुलगी 13 वर्षांची असून दोघेही शाळेत शिकत आहेत. अनिल या पूर्वीही दोन ते तीन वेळा महाबळेश्वर येथे आपल्या कुटंबा बरोबर फिरायला आला होता.

दोघांच्यात अलिकडे सारखी भांडणे होत होती. या भांडणातुनच अनिलने आपल्या पत्नीचा मोबाईल काढुन घेतला होता. मोबाईल नसल्याने सिमाला आपल्या आईला फोनही करता येत नसे. जेव्हा अनिल कामावरून घरी येईल तेव्हाच अनिलच्या मोबाईल वरून ती नेहमी आपल्या आईशी संपर्क साधत होती. महाबळेश्वरला जाणार असल्याचे दोघांनीही कोणालाही सांगितले नव्हते.