कौटुंबिक वाद विकोपाला गेला, पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला

सामना प्रतिनिधी । आळंद

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला केलेल्या जबर मारहाणीत तिचा मृत्यू झाली. ही घटना नायगव्हाण येथील शेतवस्तीवर घडली. कौटुंबिक वादातून झालेला हा प्रकार गुरुवार, 6 रोजी सकाळी उघडकीस आला. मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून वडोद बाजार पोलिसांत पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कन्नड तालुक्यातील मोहाडी शिवारातील सोमिनाथ जंगले याची बहीण कांताबाई हिचा विवाह फुलंब्री तालुक्यातील नायगव्हाण येथील दादाराव अण्णा दाढे याच्यासोबत झाला होता. काही दिवसांपूर्वी कांताबाईस गाडी घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण होऊ लागली. तिने फोनवर भावास सांगितल्यानंतर सोमिनाथ नायगव्हाण येथे गेले. त्यावेळी दादाराव दाढे याने सांगितले की गाडी घेण्यासाठी दीड लाख रुपये द्या; नसता पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत तुमच्याकडेच राहू द्या, असे सांगितल्याने सोमिनाथ बहीण कांताबाईस घेऊन माहेरी गेला. 3 महिन्यांपूर्वी बाबरा येथील सोनाजी सखाराम राऊतराय यांना घेऊन दादाराव मोहाडीस आला. दादाराव आता दारू पिणार नाही व मारहाण करणार नाही. आता पैसेही नकोत. फक्त कांताबाईला नांदायला पाठवा, असे सांगितल्यामुळे कांताबाईची समजूत काढून नांदावयास पाठवले.

गुरुवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास बाळू नावाच्या व्यक्तीने फोन करून सोमिनाथला तुमच्या बाहिणीची तब्येत खराब असून, भेटावयास वडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात या, असा निरोप दिला. सोमीनाथ तेथे पोहोचल्यावर शवगृहात बहिणीचा मृतदेह आढळला. कांताबाईचा मृत्यू पती दादारावने 5 सप्टेंबर रोजी 8 ते 9 वाजेच्या सुमारास लाकडी दांड्याने मारहाण केल्यामुळे झाला.

बुधवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात दादारावने लाकडी दांड्याने केलेल्या जबर मारहाणीत कांताबाई बेशुद्ध पडली. मारहाण झाल्यानंतर कांताबाईच्या मुलांनी याबाबत शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील कैलास पवार यांनी वडोदबाजार पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळी वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी भेट देऊन कांताबाईचा मृतदेह ताब्यात घेऊन वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. या प्रकरणी दादाराव दाढे यास ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, ठसेतज्ज्ञ पथक व श्वानपथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सोमिनाथ जंगले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस बंदोबस्तात कांताबाईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.