भयंकर! शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनी केले चिमुरडीचे लैंगिक शोषण


सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणामधील हैदराबाद येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे नर्सरीत शिकणाऱ्या साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचे त्याच शाळेतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये दगड टाकल्याचे भयंकर कृत्य केले. याप्रकरणी दोन्ही आरोपी महिलांवर पॉक्सो कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी महिला फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पीडित मुलगी हैदराबादमधील माधोपूर येथील एका खासगी शाळेत नर्सरीत शिकत आहे. 10 एप्रिल रोजी शाळेतून घरी आल्यावर मुलगी सतत रडत असल्याने तिच्या आईला संशय आला. तिने मुलीला काय होत आहे असे विचारले. त्यावर मुलीने शाळेत घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थेट पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला रुग्णालयात दाखल केले. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोपी महिलांवर पॉक्सो कायद्यातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.