दुष्काळी जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करणार : बानगुडे-पाटील


सामना प्रतिनिधी । कराड

राज्यात 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात कृष्णा-खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालेले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या काळात रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी दुष्काळी जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची प्रतिक्रिया कृष्णा-खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील यांनी दिली. तसेच माझी निवड हा जिल्ह्यातील शिवसैनिकांचा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृष्णा-खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच कराड दौर्‍यावर आलेल्या बानगुडे-पाटील यांनी कृष्णाबाई घाटावर जाऊन कृष्णा नदीतील पाण्याचे पूजन केले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते, युवासेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, अजित यादव,कराड दक्षिण संपर्कप्रमुख संजय गायकवाड, तालुका प्रमुख शिक्षकांत हापसे, किरण भोसले, नितीन काशिद उपस्थित होते.

बानगुडे-पाटील म्हणाले, दुष्काळी कलंक पुसण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकारच्या काळात कृष्णा-खोरे विकास महामंडळाची निर्मिती केली. या माध्यमातून 1995-1999 या काळात अनेक सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. मात्र, युतीचे सरकार जाऊन आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या पंधरा वर्षात त्या योजना रखडल्या. पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेल्या योजना पुर्णत्वास नेण्यावर आपण भर देणार आहोत. इंच न इंच जमीन पाण्याखाली आली पाहिजे, या दृष्टीने काम करणार आहे. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार वाट्याला येणारे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचे काम करू. गोदावरीचे पाणी कृष्णा नदीत सोडल्यामुळे मिळणारे अतिरिक्त 14 टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहचविण्यासाठी योजना कार्यान्वित करण्याचे ध्येय आहे. जिल्ह्यातील जिहे-कटापूर योजनेला गती आली असून ती लवकरच पुर्णत्वास जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माण तालुक्यातील 50 टक्के भाग दुष्काळीच आहे. त्या भागाला पाणी देण्यासाठी प्राधान्य राहिल. धनगरवाडी योजनेला 13 कोटीचा निधी मंजूर झाला असून हणबरवाडी योजनेच्या जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून बानगुडे-पाटील म्हणाले, रखडलेल्या योजनांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेत आहे. सर्वच योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. परंतु, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. परिणामी, दुष्काळी भागातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. हणबरवाडी-धनगरवाडी योजनेला गती आणण्यासाठी निधी नियामक मंडळाच्या बैठकीत या योजनेला 50 कोटीचा निधी मंजूर करून घेणार आहे.