मला काँग्रेसकडून ऑफर आहे! नाना पटोलेंचा खुलासा

सामना ऑनलाईन, नागपूर

भाजपाचे खासदार नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील सरकारच्या धोरणांबाबत नाराज आहे, त्यांनी आपली नाराजी ही वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. भाजपावर टीका करणाऱ्या नाना पटोले यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्याला काँग्रेसने ऑफर दिली असल्याचं पटोले यांनीच आज नागपुरात पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मी पक्षाच्या विरोधात बोलत नसून मी सरकारच्या धोरणांबाबत बोलत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांच्यावर पक्ष कारवाई करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की माझ्याऐवजी पक्षाने महिलांचा अपमान करणाऱ्या गिरीश महाजन आणि कर्जमाफी दिल्याने सरकार कर्जबाजारी होईल असं म्हणणाऱ्या मंत्र्यांविरोधात कारवाई करा.

पटोले यांनी यशवंत सिन्हा यांना जीएसटीवर बोलण्यासाठी विदर्भात आणलं होतं, त्यानंतर ते शत्रुघ्न सिन्हा यांना १ डिसेंवरला अकोल्यात होणाऱ्या धान,कापूस सोयाबीन परिषदेसाठी बोलावलं आहे. यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोघेही भाजपवर नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. यामुळे भाजपातील नाराजांना पटोले हे एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपत अनेक जण नाराज आहे, आणि ते कोण आहेत हे मला माहिती असल्याचंही पटोले म्हणाले आहेत.

पटोले यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की राहुल गांधी यांनी मला फोन करुन भेटायची इच्छा असल्याचे सांगितले. आपण त्यांना हिवाळी अधिवेशनादरम्यान भेटणार असल्याचं पटोलेंनी जाहीर करून टाकलंय. केंद्रातील सरकार हे अप्रामाणिक झालं असून भाजपने त्यांच्या कार्यक्रमासाठीच्या बॅनर पोस्टरवरून माझं नाव फोटो काढलं ते बरं झालं असं पटोलेंनी म्हटलंय. जिथे खोटारडेपणा आहे तिथे माझा फोटो नकोच होता,त्यामुळे झालं ते बरंच झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.