मला त्रास देणारा शनि कोण आहे हे मला माहिती आहे!


सामना ऑनलाईन, मुंबई

‘शनिच्या साडेसातीमुळे मला गेली काही वर्ष क्लेष आणि दु:ख सहन करावे लागले. मात्र माझ्या मागे लागलेला हा शनि कोण आहे हे मला चांगलं माहिती आहे’ असं विधान भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं आहे. खडसेंना त्रास देणारा हा शनि नेमका कोण याची चर्चा त्यांच्या या विधानामुळे सुरू झाली आहे. खडसेंवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत एकनाथ खडसे हे भाजपमध्ये अडगळीत टाकल्यासारखे झाले आहेत.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खडसे यांनी त्यांची व्यथा मांडली. पुढची विधानसभा निवडणूक लढवायची की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या एकनाथ खडसे आहेत. गेली तीन साडेतीन वर्ष जे मी सहन केलं त्यानंतर राजकारणाबद्दल मला घृणा निर्माण झाली आहे असं हताश वक्तव्य खडसे यांनी केलं आहे. ’40 वर्ष भाजपच्या विस्तारासाठी मेहनत घेतलेल्या माणसाला अशी वागणूक मिळत असेल तर त्याबद्दल चीड निर्माण होते’ असं खडसेंनी म्हटलंय. त्यामुळेच अशा घाणेरड्या राजकारणाचा मला वीट यायला लागलाय असं खडसेंचं म्हणणं आहे. माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले मात्र त्यात तथ्य नाही असं प्रत्येक वेळी समोर आलं. ही गोष्ट फक्त माझ्याच वाट्याला आली बाकीच्यांच्या वाट्याला आली नाही असं म्हणत खडसे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.