नोटाबंदीनंतर फक्त १.६ % काळापैसा लागला हाती


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदीचं ब्रह्मास्त्र वापरून हिंदुस्थानी जनतेच्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या केंद्र सरकारच्या हातीशी अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे अवघा १.६ टक्के इतकाच काळापैसा हाती लागला आहे. यामुळे नोटाबंदीनंतर काळापैसावाल्यांवर वचक बसेल आणि सरकारला मोठ्या प्रमाणावर यश मिळेल हे स्वप्न धुळीला मिळाले आहे. आयकर विभागाच्या ५ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, ५ जानेवारी पर्यंत ४,८०७ कोटी रुपयाचेच अघोषित उत्त्पन्न लोकांच्या हाती आले आहे. यामध्ये काहींनी स्वत:हून ही माहिती सरकारकडे दिली आहे, तर अन्य संपत्ती ही देशात विविध ठिकाणी पडलेल्या छाप्यांमधून समोर आली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

नोटाबंदीनंतर आयकर विभागाच्या कायद्याअंतर्गत १,१३८ तपास, सर्व्हे – चौकशी, कर चुकवेगिरी संदर्भात विविध व्यक्ती आणि संस्था मिळून ५,१८४ नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ६०९.३९ कोटी किमतीची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ११२.८ कोटी रुपयांच्या नव्या नोटा आणि २००० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. तर दागिन्यांची किंमत ९७.८ कोटी रुपये इतकी आहे.

नोटाबंदीचा सामान्यांना फटका

अर्थतज्ज्ञ ज्या द्रेज यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदीचा सामान्य नोकरदार वर्ग आणि विशेषता मजुरांवर मोठा प्रभाव पडणार आहे. तसेच याचा परिणाम मोठ्या काळासाठी अर्थव्यवस्थेवर दिसत राहील, असेही त्यांनी सांगितले. तसेच बेकायदा संपत्तीला चाप बसवायचा असल्यास राजकीय फंडिंग पारदर्शक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.