अण्णा हजारेंचा समाचार मी कायदेशीररित्या घेणार – खासदार शरद पवार

12

सामना ऑनलाईन । नाशिक 

समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  खासदार शरद पवार यांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपळगाव-बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.

बुधवारी ठाणे येथील पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांच्याविरोधात आपण दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याच्या मानसिकतेत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत पिंपळगाव येथे बोलताना पवार म्हणाले, अण्णा हजारे म्हणतात मी साखर कारखानदारी बंद पाडली. आज येथील निफाडचा साखर कारखाना बंद  झाला आहे. माझा या कारखान्याशी कोणताही संबंध नाही, मग कारखाना बंद का पडला ? याचं उत्तर त्यांनी द्यावं.  अण्णांचा समाचार मी कायदेशीररित्या घेणार आहेच. पण आज साखर कारखानदारी बंद का पडत आहे, याचा विचारही त्यांनी करायला हवा असे पवार म्हणाले.

कृषीमंत्री असताना काद्यांच्या भावाविरुध्द अनेक मोठी आंदोलने झाली, परंतु मी शेतकऱ्यांवर निर्यातबंदी लादली नाही.

यावेळी पुढे बोलताना शदर पवार म्हणाले, आज देशामध्ये कांदा-टोमॅटोची चर्चा सुरू झाली तर पहिलं नाव पिंपळगावचे येते. देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशाच्या बाहेरही इथला माल जात असतो. कांद्याचे थोडे भाव वाढले तर देशभरासहीत दिल्लीतही अस्वस्थता पसरते. निर्यात बंदी, जीवनावश्यक गोष्टीत कांदा ठेवा असे सांगितले जाते. मी कृषीमंत्री असताना कांद्याच्या भावाविरोधात असेच आंदोलन केले गेले, मात्र काही झालं तरी मी निर्यात बंदी लादणार नाही, असा निर्णय दिला. आज कांदा,टोमॅटो, केळी सर्वच फळ-भाज्यांचे भाव घसरले आहेत. शेतकऱ्याला उत्पादन खर्चही त्यात काढता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे यावेळी .पवार यांनी सांगितले

नोटाबंदीनंतर देशवासियांनी आधी स्वागत केले. पण त्यातली खरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं घबाड निघतंय म्हणून लोक खुष होते.

जनधन खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, असे आश्वासन पुर्ण करतील अशी आशा जनतेला होती. काळा पैसा आणायला मोदी वाजतगाजत स्विर्त्झलँडला गेले मात्र तिथून हात हलवत परत यावे लागले होते. म्हणून हा नोटबंदीचा निर्णय घेऊन जनतेचे लक्ष वळवले गेले. नोटबंदीनंतर चार-पाच दिवस सहकारी बँकांनी नोटा स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यानंतर सहकारी बँकाच्या नोटा घेणार नसल्याचा आदेश निघाला. तोपर्यंत ८ हजार ६०० कोटींची रक्कम जमा झाली. त्याचे व्याज चालू झाले. पण रिझर्व्ह बँकेने नोटा घ्यायला नकार दिल्यामुळे सहकारी बँका अडचणीत आल्या. सुप्रीम कोर्टाने सहकारी बँकेच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देऊनही सरकारने त्या नोटा घेतलेल्या नाहीत. लोकांचा पैसा लोकांच्या गरजेनुसार न काढता सरकार अमुक-तमुकच काढा असा आदेश देत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

खोटा नोट्या छापणारे कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना फासावर लटकवा.-

खोटा नोट्या छापणारे आमच्यात असतील-नसतील तर त्यांना फासावर लटकवा, त्यांना योग्य तो धडा शिकवा, असं सरकारला मी सांगितले आहे.  नोटा छापणारे लोक घातक असून कोणत्याच पक्षात असे लोक असता कामा नये, असे माझे मत आहे. नोटाबंदीमुळे उद्योगातून कामगार कपात होत आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे. छोट्या उद्योजकांना जास्त झळ पोहोचलेली आहे. याचा एकत्रित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

नोटांबदीची सर्वाधिक धास्ती भाजपाच्या खासदारांना

नोटाबंदी नंतर सर्वाधिक काळापैसा भाजपाशी निगडीत लोकांकडे सापडला असून आता सोनं तपासण्याची वेळ आली तर ही आमची अखेरची खासदारकी असेल, असे भाजपचे खासदार खासगीत येऊन सांगत असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.नोटाबंदीच्या बाबतीत आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. लोक सध्या गप्प आहेत म्हणजे ते वेडे नाहीत. आणीबाणीच्या वेळेला लोकं अशीच गप्प होती आणि निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आज घेतलेला निर्णय हा नोटबंदीचा आहे की नसबंदीचा, हे मतदानाला गेल्यावरच लोक ठरवतात असे पवार म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या