कुटुंबीयांसमोर झुकणार नाही, धावपटू द्युती चंद निर्णयावर ठाम

10

सामना ऑनलाईन । हैदराबाद

समलैंगिक संबंध असल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर अडचणीत आलेली धावपटू द्युती चंद हिने घरच्यांच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. द्युती चंदला तिच्या कुटुंबीयांनी घरातून हकालपट्टी करण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर द्युतीने हे वक्तव्य केलं असून पार्टनरसोबतचे समलैंगिक संबंध सुरूच ठेवणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने 377 कलम बाबत दिलेल्या निर्णयामुळे मला बळ मिळालंय. आमच्यासाठी हा निर्णय मोकळ्या हवेसारखाच आहे. आम्ही कुणासोबत राहतो आणि कुणासोबत नाही, यावर मत मांडण्याचा इतरांना अधिकार नाही, हे आम्ही वारंवार सांगायचो, आमच्या या म्हणण्यालाच कोर्टाच्या निर्णयानं बळ मिळालं आहे. समलैंगिक संबंध असणं ही खासगी बाब आहे. त्यातून कुणी दुखावले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जगाने आम्हाला समजून घ्यावं, आमच्या मनोभूमिकेचा आदर करावा यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं आम्हाला वाटतंय, असं द्युतीने सांगितलं. दरम्यान, आपल्या पार्टनरचं नाव जाहीर करणार नसल्याचंही तिनं स्पष्ट केलं. सध्या तिला सर्वांसमोर यायचं नाही. तिच्या इच्छेचा मी सन्मान करते. तिला कोणताही त्रास होऊ नये हीच माझी इच्छा आहे, असेही द्युतीने सांगितलं. माझी पार्टनर 19 वर्षाची असून ती भुवनेश्वर विद्यापीठात शिकतेय. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. तिलाही माझ्याप्रमाणेच स्पोर्टपर्सन बनायचं आहे. माझा सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी ती मला भेटली. त्यामुळे रोज भेटणं झालं आणि आमचं भावनिक नातं जुळलं, असंही द्युतीने स्पष्ट केलं.

कुटुंबियांच्या धमक्यांना घाबरत नाही
समलैंगिक संबंधाच्या खुलाशानंतर कुटुंबीयांकडून मिळणाऱया धमक्यांवर बोलताना द्युतीने अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचं स्पष्ट केलं. माझ्या मोठय़ा बहिणीने मला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली आहे. माझ्या भावाच्या बायकोशी पटत नसल्याने तिने माझ्या भावालाही घरातून हाकलून दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या धमक्यांना मी घाबरून जाणार नाही. मी सज्ञान आहे आणि मला माझा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं ती म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या