विराटविरुद्ध ‘स्लेजिंग’ म्हणजे आगीशी खेळ ठरेल

सामना ऑनलाईन, मुंबई – हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याची धावा बरसणारी बॅट म्हणजे टीम इंडियाला लाभलेले अमोघ अस्त्र आहे. त्यामुळे विराटला रोखायचे असेल तर प्रभावी तंत्रच उपयोगी पडेल, ‘स्लेजिंग’सारख्या प्रकाराने विराटमधील आक्रमकता अधिकच उफाळून आल्यास तो प्रकार म्हणजे आगीशीच खेळ ठरेल, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने मुंबईत क्रिकेट कॉमशी बोलताना व्यक्त केलेय.

‘रनमशीन’ विराट कोहली याने सलग १३ कसोटी लढतींत वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशाविरुद्ध १४५७ धावांचा पाऊस पाडला आहे. शिवाय गेल्या सलग चार कसोटी मालिकांत ४ द्विशतके झळकावत विराटने आपल्या पराक्रमाने अवघ्या क्रिकेट जगताला प्रभावित केलेय. त्यामुळेच बलाढ्य ‘कांगारूं’नी हिंदुस्थानी फिरकीबरोबरच विराट कोहलीच्या तुफान फलंदाजीचा धसका घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मॅक्सवेलसारखे नामवंत क्रिकेटपटू विराटविरुद्ध ‘स्लेजिंग’ नको रे बाबा असे उघडपणे बोलू लागले आहेत.

मैदानात विराटच्या विरोधात मी तरी ‘स्लेजिंग’सारख्या प्रकारात सहभागी होणार नाही. असे सांगून मॅक्सवेल म्हणाला, स्लेजिंगसारख्या प्रकाराने एकाग्रता भंग करून घेणाऱ्यांपैकी कोहली नाहीय. हे त्याने अशा प्रकारानंतर अनेकदा तुफानी फलंदाजी करीत सिद्ध केलेय.

विराटच्या अफलातून तंत्राचा आम्ही अभ्यास करीत आहोत

विराट कोहलीच्या बॅटमधून वाहणाऱ्या धावांमागे त्याचे अफलातून तंत्र आणि जिगरबाज खेळ आहे. त्याला रोखण्यासाठी कोणतीही विशिष्ट व्यूहरचना अद्याप प्रभावी ठरलेली नाहीय. विराट मैदानात ज्या धडाक्याने खेळतो तो धडाका स्तुत्यच आहे. त्यामुळे त्याच्या अफलातून फलंदाजी तंत्राचा अभ्यास आम्ही अजून करीत आहोत, असेही अष्टपैलू मॅक्सवेलने स्पष्ट केले.

हिंदुस्थानी वातावरणाशी जुळवून घेऊ

आमचे बरेचसे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएलसाठी अनेक महिने हिंदुस्थानात खेळतात. त्यामुळे हिंदुस्थानी वातावरण व इथल्या खेळपट्टय़ांशी ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच जुळवून घेईल असा विश्वासही मॅक्सवेलने व्यक्त केला.

विराटच्या ‘फिटनेस’चा हेवा वाटतोय!

क्रिकेट या खेळात सतत कठीण शारीरिक व्यायाम घ्यावा लागत असल्याने क्रिकेटपटूंना फिटनेसमध्ये सातत्य राखणे कठीणच जाते. पण हिंदुस्थानचा विद्यमान कर्णधार विरार कोहलीचा ‘फिटनेस’ इतका अफलातून आहे की मलाही त्याचा हेवा वाटतोय, अशी भावना माजी हिंदुस्थानी कर्णधार कपिलदेव याने बोलून दाखवलीय.

कोहलीचा गेल्या पाच मालिकांतला खेळाचा धडाका अप्रतिम व स्तुत्य आहे. त्याच्या खेळात मला तरी सर व्हिव्हियन रिचर्डस्ची आक्रमकता आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची नजाकत यांचा संगम दिसतोय, असे सांगून कपिल म्हणाला, विराटचा मजबूत फिटनेस व त्याची जिगर ही त्याच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीची प्रमुख कारणे आहेत. त्याच्या पराक्रमी वाटचालीमुळे भविष्यात क्रिकेटशौकीन सर डॉन बॅडमनऐवजी विराटचे उदाहरण भावी पिढीला देऊ लागले तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही.

… तर तो ‘किंग’ रिचर्डस्लाही मागे टाकेल

‘रनमाशीन’ विराटने आपला खेळाचा धडाका असाच कायम ठेवला तर तो लवकरच सर व्हिव्हियन रिचर्डस्सारख्या महान क्रिकेटपटूला मागे टाकेल. असा विश्वास व्यक्त करून कपिल म्हणाला, पूर्वी क्रिकेटपटू किती ईद आणि किती दिवाळीपर्यंत संघात खेळला यावरून आम्ही त्याचे मोठेपण ठरवायचो. पण विराटचे तंत्र, त्याचा फिटनेस व त्याची जिद्द हे सर्वच काही आगळेवेगळे आहे म्हणूनच मी द. आफ्रिकेच्या ए. बी. डिव्हिलीयर्सपेक्षा कोहलीला उजवा मानतो.