वायुदलाच्या बंगळुरूतील तळावरुन गुप्तहेराला अटक?

सामना ऑनलाईन । बंगळुरू

वायुदलाच्या बंगळुरूतील येलाहान्का तळावरुन एका गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. वेल्डिंगचे काम करण्याच्या निमित्ताने आधुनिक मोबाइलच्या मदतीने तळाच्या प्रतिबंधीत भागाचे विविध दिशांनी फोटो काढणाऱ्या ममनून (२४) नावाच्या तरुणाला सुरक्षा पथकाने अटक केली आहे. ममनूनजवळ नऊ सिमकार्ड सापडली आहेत. ममनूनने सौदी अरेबियातील एका व्यक्तीशी वेळोवेळी फोनवर बोलून विमानतळाच्या विविध भागांचे फोटो काढल्याचे उघड झाले आहे.

मूळचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथील रहिवासी असलेला ममनून विमानतळाचे ज्या पद्धतीने फोटो काढता होता त्यावरुन दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी हेरगिरी सुरू असल्याचा संशय वायुदलाने व्यक्त केला आहे. येत्या १४ फेब्रुवारी पासून १८ फेब्रुवारी पर्यंत येलाहान्का तळावर प्रीमियर मिलिटरी एविएशन शो अर्थात लष्करी विमान आणि हेलिकॉप्टरच्या सामर्थ्याचे प्रदर्शन होणार आहे. गुप्तहेराला पकडल्यानंतर ‘प्रीमियर मिलिटरी एविएशन शो’साठीच्या बंदोबस्तात बदल करण्याचा तसेच संरक्षण व्यवस्था आणखी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ममनूनची सेंट्रल क्राइम ब्रँचमार्फत (सीसीबी) चौकशी सुरू आहे; असे वायुदलाने सांगितले. याआधी सप्टेंबर २०१६ मध्ये पठाणकोट येथे वायुदलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.