हनी ट्रॅप… सेक्स चॅट करताना ग्रूप कॅप्टनने पुरवली हिंदुस्थानची गुप्त माहिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून हिंदुस्थानची महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला दिल्याच्या संशयावरून हवाईदलाच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. या अधिकाऱ्याच्या अटकेचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाले. या वृत्ताला स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दुजोरा दिला आहे. हवाईदलात ग्रूप कॅप्टन असलेल्या या अधिकाऱ्याचे नाव अरुण मारवाह आहे.

मारवाह हवाई दलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात तैनात होते. त्यांच्याकडून हेरगिरीसंदर्भात मोबाईल फोन आणि काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ५१ वर्षांचे मारवाह यांनी महत्वाच्या कागदपत्रांचे स्मार्टफोनमधून फोटो घेतले आणि पाकिस्तानला पुरवले असा आरोप त्यांच्यावर आहे.

मारवाह यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरच्या दोन अकाउंट किरन रंधवा आणि महिमा पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्या अकाउंटवर ते सेस्क चॅट करत होते. त्यानंतर ते सेक्स चॅटच्या इतके आहारी गेले की त्यांनी हिंदुस्थानची गोपनीय माहिती देण्याची तयारी दर्शवली. हे दोन्ही अकाउंट आयएसआयचे अधिकारी खोट्या नावाने चालवत होते.

किरन रंधवा या अकाउंटवरील स्त्रीने आपले वय २० वर्ष असल्याचे सांगितले. तसेच आपण मॉडेलिंग क्षेत्रात आहोत अशीही माहिती दिली. मग तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहाण्यासाठी मारवाह आतूर झाले त्यांनी व्हॉट्सअॅपवरून चॅटिंग करण्याचा आग्रह धरला. पण समोरून सीम कार्ड नसल्याची माहिती देण्यात आली. तर मारवाह यांनी तिला सीमकार्ड उपलब्ध करून दिले, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. या दरम्यान हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.