याआधीही सरफराजने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला हरवले होते

सामना ऑनलाईन । लंडन

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सरफराजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर १८० धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेल्या ३३९ धावांचा पाठलाग करताना हिंदु्स्थानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हिंदुस्थानचा संपूर्ण संघ ३० षटकांत १५८ धावांमध्ये गारद झाला. मात्र तुम्हाला हे माहित आहे का याच सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने याआधीही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानचा पराभव केला होता.

१९ फेब्रुवारी २००६ रोजी झालेल्या अंडर १९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानचा पराभव केला होता. सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळताना पाकिस्तानने हिंदुस्थानला ७१ धावांत रोखत ३८ धावांनी विजय मिळवला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फक्त १०९ धावा केल्या होत्या, मात्र सरफराजच्या चाणाक्ष नेतृत्वामुळे पाकिस्तानने विजय मिळवला.

या सामन्यात हिंदुस्थानचे पाच फलंदाज शुन्यावर बाद झाले होते. विशेष म्हणजे त्या सामन्यात पाकिस्तानकडून खेळलेला इमाद वासिम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही होता. तर हिंदुस्थानचे रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा हे दोघेही तो सामना खेळले होते.