‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाविरोधातील 500 कोटींचा दावा आयसीसीने फेटाळला आहे.

‘बीसीसीआय’ने ‘आयसीसी’च्या वेळापत्रकानुसार असलेल्या दोन द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिला. त्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असा दावा पीसीबीने केला होता. त्यामुळे बीसीसीआयने आम्हाला 70 मिलियन डॉलर द्यावी अशी मागणी पीसीबीने केली होती. ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व राजीव शुक्ला यांनी हिंदुस्थानची बाजू मांडली. आमच्या सरकारची परवानगी असल्याशिवाय आम्ही पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानने आधी दहशतवाद संपवावा आणि मग हिंदुस्थानशी क्रिकेट खेळायची भाषा करावी, असे म्हणणे ‘बीसीसीआय’ने आयसीसीसमोर मांडले.

bcci-pcb

याच दरम्यान पीसीबीचे प्रमुख एहसान मनी यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यासाठी आयसीसीने प्रयत्न करावे असे म्हटले होते. हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट मंडळांमध्ये झालेल्या परस्पर समन्वय करारानुसार उभय देशांमध्ये 2012 ते 2023 दरम्यान सहा द्विपक्षिक मालिका होणार होत्या. 2012-13 मध्ये पाकिस्तानचा संघ हिंदुस्थानात आला होता, परंतु यावेळी तोडेच सामने खेळण्यात आले होते. तसेच उभय देशांमध्ये झालेला सहा द्विपक्षिक मालिकांचा हा करार आमच्यावर बंधनकारक नाही, असा दावा ‘बीसीसीआय’ने केला होता. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर आयसीसीने पाकिस्तानचा भरपाईचा दावा फेटाळला आहे. त्यामुळे आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.