कसोटी कर्णधार कोहलीला मानाची गदा

1

सामना ऑनलाईन । केपटाऊन

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीला ‘आयसीसी’कडून मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आयसीसी’च्या कसोटी विजेतेपदाचे प्रतीक म्हणजे ही गदा होय. हिंदुस्थानी संघाला ‘आयसीसी’कडून दहा लाख डॉलरचे (जवळपास ६५ कोटी रुपये) बक्षिस देण्यात येणार आहे. १ एप्रिलपर्यंत जो संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहतो त्या संघाकडे मानाची गदा सुपूर्द करण्यात येते. १ एप्रिल २०१८ पर्यंत ‘टीम इंडिया’ अव्वल स्थानावर विराजमान राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ने आताच ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा देऊन सन्मानित केले. ‘टीम इंडिया’चे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ग्रॅम पोलॉक यांच्या हस्ते विराट कोहलीला केपटाऊनमध्ये कसोटी चॅम्पियनशिपची मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याबरोबरच दहा लाख डॉलरचे बक्षीसही देण्यात येणार आहे. १० लाख डॉलर म्हणजे जवळजवळ ६५ कोटींची कमाई ‘टीम इंडिया’ने २०१७-१८ च्या सत्रात केली आहे. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती, मात्र २०१५ पासून ही रक्कम १० लाख डॉलर इतकी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही हिंदुस्थानने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही ‘टीम इंडिया’ला यापूर्वी दोन वेळा ‘आयसीसी’ची मानाची गदा पटकावून दिली आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानने चमकदार कामगिरी केली आहे. म्हणूनच कोहलीच्या सेनेने सलग दोन वर्षे ‘आयसीसी’ची मानाची गदा उंचावली आहे.

आयसीसीची ताजा गुणतालिका

हिंदुस्थान – १२१
दक्षिण आफ्रिका – ११५
ऑस्ट्रेलिया – १०४
न्यूझीलंड – १००
इंग्लंड – ९९
श्रीलंका – ९५
पाकिस्तान – ८८
वेस्ट इंडीज – ७२