13 वर्षांनंतर कांगारूंचा गोलंदाज नंबर वन, फलंदाजीत कोहली अव्वल

सामना ऑनलाईन । दुबई

‘आयसीसी’च्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले. तब्बल 13 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला ही उपलब्धी मिळविता आली. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राने 2006 मध्ये कसोटीच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.

ग्लेन मॅग्रानंतर एकाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला आतापर्यंत ‘आयसीसी’ कसोटी क्रमवारील अव्वल स्थान मिळविता आले नव्हते. माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने 2009मध्ये दुसऱया स्थानापर्यंत मजल मारली होती. मात्र पॅट कमिन्सने अखेर ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान होण्याचा मान मिळविला. ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसन दुसऱया स्थानावर आला आहे.

कोहली अव्वल, पुजारा तिसऱ्या स्थानी कायम

‘आयसीसी’च्या ताज्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली 992 गुणांसह अव्वल स्थानी कायम असून चेतेश्वर पुजारानेही तिसरे स्थान कायम राखले आहे. श्रीलंकेचा कुशल परेराने 40 व्या स्थानी झेप घेतली.