टी-२०मध्ये विजय हिंदुस्थानचा, फायदा पाकिस्तानचा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघामध्ये झालेल्या तीन टी-२० सामन्यांची मालिका हिंदुस्थानने २-१ असा विजय मिळवला होता. तिरुअनंतपुरम येथे झालेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने ६ धावांनी विजय मिळवला. मात्र या विजयाचा फायदा हिंदुस्थानला कमी आणि पाकिस्तानला जास्त झाल्याचे दिसून आला आहे.

हिंदुस्थानच्या विजयामुळे पाकिस्तान टी-२०मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिका विजयाचा हिंदुस्थानला मात्र क्रमवारीत फायदा झालेला नाही. या मालिका विजयानंतरही हिंदुस्थान आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे. हिंदुस्थान आणि इंग्लंडचे समान म्हणजेच ११९ गुण आहेत. मात्र सरस कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने चौथे स्थान मिळवले आहे.

ताज्या क्रमवारीत पाकिस्तान १२४ गुणांसह पहिल्या, न्यूझीलंड १२० गुणांसह दुसऱ्या, वेस्ट इंडिज १२० गुणांसह तिसऱ्या, इंग्लंड ११९ गुणांसह चौथ्या, तर हिंदुस्थान ११९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. हिंदुस्थानपाठोपाठ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अनुक्रमे ११२ गुण आणि १११ गुणांसह सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत.