आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर वन

सामना ऑनलाईन । दुबई

श्रीलंकेला त्यांच्याच घरात जाऊन कसोटी, वन डे आणि टी-२० क्रिकेट मालिकेत चारीमुंडय़ा चीत करणाऱया टीम इंडियाने आयसीसी कसोटी गुणांकनात टॉपच्या स्थानावर मजल मारली आहे. श्रीलंकेला त्यांच्या खेळपट्टय़ांवर कसोटीत ३-०, वन डे मालिकेत ५-० आणि टी-२० त १-० असा पराभवाचा झटका देण्याचा भीमपराक्रम ८५ वर्षांनंतर करत कर्णधार विराट कोहलीच्या हिंदुस्थानी संघाने क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव लिहिले आहे.

टीम इंडिया आयसीसी कसोटी गुणांकनात नंबर वनवर गेली असताना बलाढय़ ऑस्ट्रेलियन संघाला मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी पराभवामुळे गुणांकनात पाचव्या स्थानी घसरावे लागले आहे. हिंदुस्थान १२५ गुणांसह कसोटी गुणांकनात टॉपवर आहे. त्यापाठोपाठ ११० गुणांसह दक्षिण आफ्रिका दुसऱया तर १०५ गुणांसह इंग्लंड तिसऱया स्थानी आहे. प्रत्येकी ९७ गुण असणारे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात न्यूझीलंडने चौथे स्थान पटकावले. तर ३४ लढतींतून ९७ गुण मिळवणारा ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर गेला आहे.

ताजे आयसीसी कसोटी गुणांकन

स्थान       देश          लढती      गुण

1)      हिंदुस्थान         ३६       १२५

2)     द. आफ्रिका      ३७        ११०

3)       इंग्लंड           ३९        १०५

4)     न्यूझीलंड          ३२         ९७

5)    ऑस्ट्रेलिया         ३४         ९७

6)    पाकिस्तान         ३१         ९३

7)     श्रीलंका           ३६         ९०

8)    वेस्ट इंडीज        २६         ७५

9)    बांगलादेश         २०         ७४

10)  झिम्बाब्वे           १०          ०

बांगलादेशकडून पराभवाचा धक्का मिळाल्याने ‘कांगारू’ मागे

बांगलादेश दौऱयाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया १०० गुणांसह कसोटी गुणांकनात चौथ्या स्थानी होता. त्याच स्थानावर कायम राहण्यासाठी त्यांना बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका किमान १-० अशी जिंकायची होती, पण बांगलादेशने एका कसोटीत पराभूत केल्याने ही मालिका  १-१ अशी बरोबरीत सुटली आणि ‘कांगारूं’ना गुणांकनात घसरावे लागले.