#ICCWorldCup 44 वर्षात पहिल्यांदाच, हिंदुस्थानच्या संघात एकाच वेळी 4 अष्टपैलू खेळणार

>> गणेश पुराणिक

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आता सर्व क्रीडा प्रेमींना वेध लागले आहेत. 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या 12 व्या विश्वचषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा संघ सज्ज आहे. वर्ल्डकप साठी निवड समितीने 15 खेळाडूंची निवड केली असून इतिहासात पहिल्यांदाच 4 अष्टपैलू खेळाडू खेळतानी दिसतील. याआधी 2003 आणि 2011 च्या वर्ल्डकप साठी 3 अष्टपैलू खेळाडू निवडण्यात आले होते, तर इतर वर्ल्डकप मध्ये 2 पेक्षा जास्त अष्टपैलू खेळाडूंची निवड झाली नव्हती.

इंग्लंडसारख्या वेगवान पिचवर अष्टपैलू खेळाडू आवश्यक आहेत. कारण गेल्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर हिंदुस्थानला चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची कमी भासली होती. इंग्लंडने हिंदुस्थानवर 2-1 असा विजय मिळवला होता. त्याचमुळे वर्ल्डकप साठी हार्दिक पंड्या, केदार जाधव, विजय शंकर आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली.

ठळक घडामोडी –

  • 1975 च्या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या संघात एकही अष्टपैलू नव्हता. तर 1979 ला कपिल देव आणि 1983 च्या वर्ल्डकप मध्ये कपिल देव यांच्यासह सुनील वासन यांची अष्टपैलू म्हणून निवड झाली होती. हा विश्वचषक आपण जिंकला होता.
  • 1992 ला झालेल्या वर्ल्डकप मध्ये कपिल देव हे एकमेव अष्टपैलू खेळाडू होते, तर 1996 ला हिंदुस्थानच्या संघात एकही अष्टपैलू खेळाडूचा समावेश नव्हता.
  • 1999 ला रॉबिन सिंग अष्टपैलू म्हणून खेळले, तर 2003 च्या वर्ल्डकप मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या संघाकडून 3 अष्टपैलू खेळाडू खेळले. या वर्ल्डकपला हिंदुस्थान फायनल पर्यंत गेला होता.
  • 2007 ला इरफान पठाण एकमेव अष्टपैलू होता. येथे हिंदुस्थानला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. 2003 ला तीन अष्टपैलू खेळले आणि हिंदुस्थानने 28 वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला.
  • 2015 ला जडेजासह स्टुअर्ट बिन्नी अष्टपैलू खेळाडू टीम इंडियाकडे होते आणि हिंदुस्थानने सेमिफायनल पर्यंत मजल मारली.
आपली प्रतिक्रिया द्या