विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर; जाडेजा, राहुल, कार्तिकला संधी


सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंड आणि वेल्समध्ये 31 मेपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड समितीने सोमवारी हिंदुस्थानी संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे, तर रोहित शर्मा उपकर्णधार असेल. विश्वचषकामध्ये हिंदुस्थानचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.

विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जयप्रती बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी.

इंग्लड आणि वेल्समध्ये 30 मे ते 14 जुलै या कालावधीत हा विश्वचषक होणार आहे. 30 मेला यजमान इंग्लड विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 48 सामने होणार असून 1992 च्या विश्वचषकाप्रमाणेच यंदाच्या विश्वचषकाचे स्वरूप असणार आहे. म्हणजेच 10 संघात रंगणाऱ्या या विश्वचषकात प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांविरूद्ध लढतील आणि यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत जातील.

#WorldCup2019 हिंदुस्थानचा संघ जाहीर, वाचा कधी आहेत हिंदुस्थानचे सामने

पहिला उपांत्य सामना गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघामध्ये होईल, तर दुसरा उपांत्य सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघात रंगणार आहे. इंग्लड आणि वेल्स या देशांमधील एकूण 11 मैदानांवर हे सामने होणार आहेत. तसेच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर या विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. यामुळे लॉर्डसला पाचव्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना घेण्याचा मान मिळणार आहे.