#ICCWorldCup वर्ल्डकपमधील हिंदुस्थानच्या नावावरील अचाट विक्रम

57

सामना ऑनलाईन | मुंबई

दोन वेळा विश्वचषक उंचावलेला हिंदुस्थानचा संघ यंदाच्या इंग्लडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. हिंदुस्थानने पहिला वर्ल्डकप 1983 ला कपिल देव, तर दुसरा वर्ल्डकप 2011 ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला. वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानने केले काही अचाट विक्रम पाहूया.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकरने 1992 ते 2011 पर्यंत खेळलेल्या वर्ल्डकप मध्ये एकूण 44 डावात फलंदाजी केली. यात त्याने 2278 धावा चोपल्या. सचिनने 1996 आणि 2003 च्या वर्ल्डकप मध्ये अनुक्रमे 500 आणि 650 पेक्षा जास्त धावा केल्या. सचिननंतर रिकी पॉंटिंग याने 42 डावात 1743 धावा केल्या आहेत.

तिसऱ्या आणि नवव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी

मर्यादित ओव्हर्सच्या खेळात भागिदारीला महत्व आहे. हिंदुस्तानच्या खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये नवव्या आणि तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी केली आहे. 1983 च्या वर्ल्डकपमध्ये झिम्बावे विरुद्ध हिंदुस्थानने 8 विकेट 140 धावांवर गमावले होते, यानंतर कपिल देव आणि सय्यद किरमानी यांच्यात नवव्या विकेटसाठी 126 रन्सची भागिदारी झाली. या सामन्यात कपिल देव यांनी नाबाद 175 धावा केल्या होत्या. नवव्या विकेटसाठीच्या भागिदारीचा हा विक्रम आहे. त्यांनंतर 1999 ला केनिया विरुद्ध राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्यात तिसऱ्या विकेट साठी 237 धावांची भागिदारी झाली. वर्ल्डकप मधील तिसऱ्या विकेटसाठी आजही ही सर्वोत्तम भागिदारी आहे.

एका वर्ल्डकप मधील सर्वाधिक धावा

2003 चा वर्ल्डकप हिंदुस्थानी क्रिकेट प्रेमींच्या कायम आठवणीत राहणार. या वर्ल्डकपमध्ये सचिनने 673 धावा ठोकल्या होत्या. या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान उपविजेता राहिला होता, परंतु सचिनला मालिकावीर किताब मिळाला होता. 2007 मध्ये सचिनचा हा विक्रम थोडक्यात वाचला होता. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडनने 2007 च्या वर्ल्डकप मध्ये 659 धावा केल्या होत्या. सचिननंतर तो दुसऱ्या स्थानावर आहे.

60 आणि 50 षटकाचा वर्ल्डकप जिंकणार एकमेव संघ

60 आणि 50 षटकांचा वर्ल्डकप जिंकणारा हिंदुस्थान एकमेव संघ आहे. हिंदुस्थानने 1983 ला 60 षटकाचा आणि 2011 ला 50 षटकाचा वर्ल्डकप जिंकला. आता ही संधी फक्त वेस्ट इंडिजचा आहे. विंडीजने 1975 आणि 1979 च्या विश्वचषकावर नाव कोरले, परंतू क्रिकेटचे स्वरूप बदलल्या पासून वर्ल्डकपने विंडीजला नेहमी हुलकावणी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या