हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी सुरू

सामना ऑनलाईन,हेग

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याचा स्पष्ट आरोप आज सोमवारी हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला. पाकिस्तानने या प्रकरणात व्हिएन्ना करार पायदळी तुडवला आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी अशी मागणी हिंदुस्थानने केली. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी हिंदुस्थानची बाजू मांडली.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून मार्च 2016 मध्ये हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविण्यात येऊन लगोलग एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. हिंदुस्थानने प्रचंड दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण यांच्या पत्नी व आईला त्यांना भेटण्याची परवानगी दिली. या भेटीच्या वेळीही दोघींना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानच्या या जुलुमाविरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देऊन पाकिस्तानच्या पेकाटात लाथ घातली. आज या खटल्यात हिंदुस्थानची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी पाकिस्तानला बेनकाब केले. व्हिएन्ना करारानुसार एखाद्या परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला उच्चस्तरीय मदत देण्यात यावी, कायदेशीर बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असा जागतिक करार करण्यात आला आहे. पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन करून कुलभूषण यांना कोणत्याही प्रकारे बचावाची संधी दिली नाही. कुलभूषण जाधव हे दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा एकही पुरावा पाकिस्तानला देता आला नाही. कुलभूषण यांचा कबुलीजबाबही दबावाखाली घेण्यात आल्याचे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे कुलभूषण यांची तत्काळ मुक्तता करण्यात यावी अशी मागणी साळवे यांनी केली.

मंगळवारी पाकिस्तानची बाजू वरिष्ठ अधिवक्ता खावर कुरेशी हे मांडणार आहेत. त्यानंतर 20 फेबुवारी रोजी हिंदुस्थान पुन्हा आपली बाजू मांडेल. 21 फेब्रुवारीला पुन्हा पाकिस्तानला बाजू मांडण्याची संधी आहे.