फोटोच्या गोष्टी…ऋषितुल्य

धनेश पाटील

भाई गायतोंडे. अगदी साधा पेहराव. फिकट पांढऱया रंगाचा झब्बा, पांढरा लेंहंगा, चेहऱयावर स्मितहास्य, हातात पंचविशीतल्या तरुणाचं बळ आणि कसलाही आविर्भाव न आणता अगदी स्वच्छंद मनाने तबल्यावर ताल धरत आपल्याच विश्वात गर्क असलेला एक निष्ठावंत तबलापटू.

प्रचंड ऊर्जेनं तबल्यावर ताकदीची थाप मारत लीलया वादन करत असलेल्या कसदार तबलापटूचे मी एक एक फोटो टिपत होतो. वादन ऐकू की फोटो टिपू असंच जणू मला झालं होतं. कोणतीही मैफल नाही, ना कोणती मुद्दाम भरवलेली संगीत सभा. घरात चार भिंतीत एका खोलीत आपला संगीत पसारा मांडून बसलेला हा कलावंत. तरीही वातावरणात एक वेगळाच गोडवा निर्माण करण्याची जादू असलेला सच्चा साधक. अगदी साधा पेहराव. फिकट पांढऱया रंगाचा झब्बा, पांढरा लेंहंगा, चेहऱयावर स्मितहास्य, हातात पंचविशीतल्या तरुणाचं बळ आणि कसलाही अविर्भाव न आणता अगदी स्वच्छंद मनाने तबल्यावर ताल धरत आपल्याच विश्वात गर्क असलेला एक निष्ठावंत तबलापटू. याच सांगीतिक वातावरणात मी फोटो टिपत होतो. तबल्याच्या नादमयतेने मला गारुडच घातलं होतं. वादन ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही की हे वयाची ऐंशी ओलांडलेले बुजुर्ग तबलापटू आहेत, इतकं खणखणीत, धारधार आणि ताकदीचं वादन. भाई गायतोंडे यांच्या तबल्यातील हीच जादू प्रत्येक संगीतप्रेमीवर नेहमीच वेगळी भुरळ पाडते. मला ही जादू अनुभवता आली ते एका फोटोशूटच्या निमित्तानं.

दुपारचे चार-साडेचार वाजले असतील. मी भाईंच्या घरी होतो. हॉलमध्ये भाई सोफ्यावर बसले होते. मी समोर हातात वही पेन घेऊन. माझ्याशी गप्पा मारत्या याव्यात म्हणून ते माझ्या बाजूला येऊन बसले. अगदी जुन्या-ओळखीतल्या व्यक्तीप्रमाणे. बोलता बोलता भाई आठवणींत रमले आणि एक एक किस्से अलगद सांगू लागले. कणकवलीत शाळेत तिसरीत शिकत असताना तबल्याची गोडी त्यांना कशी लागली ते पुढे त्यांचं इंजिनीअरिंगच शिक्षण आणि त्यांचा व्हाया मुंबई ठाण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी कुठेही खंड न पडता सांगितला. भाईंशी गप्पा मारता मारता मी त्यांच्या घरावर नजर टाकत होतो. घरातला कोणता कोपरा मला फोटोसाठी उपयोगात आणता येईल यासाठी माझी नजर शोधाशोध करत होती.

गप्पा मारता मारता भाईंनी हॉलमधल्या कपाटाजवळ मला नेलं. इथे भाईंना मिळालेल्या पुरस्कारांची आरासच मांडलेली होती. एक दोन नव्हे तर चांगली  पन्नासहून अधिक स्मृतिचिन्हे, प्रशस्तिपत्रके अन् पुरस्कारांची मांदियाळीच तिथे पाहायला मिळाली. या सगळ्या गर्दीत दिल्लीच्या ‘संगीत नाटक अकादमी’ने राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रदान केलेल्या पुरस्काराकडे माझं लक्ष गेले. संगीतातला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. भाई या पुरस्काराबाबत थोडे हळवे आहेत, हे मला तेव्हा जाणवलं. भाईंचा हाच भावनिक धागा धरून लगेच मी त्यांना फोटो काढण्यासाठी विचारलं. भाई पुरस्काराबाबत बोलता बोलता मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि तबला काढून भिंतीच्या एका बाजूला जाऊन बसले.

भाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता.

वयाची ऐंशी पार केलेल्या भाईंनी गेल्या साडेसात दशकात हजारो विद्यार्थी घडवले. भाई या नावाने जरी आज ते ओळखले जात असले तरीही त्यांचं खरं नाव सुरेश हे आहे. सुरांचा ईश असं ज्याच्या नावातच आहे त्या भाईंनी खरोखरच तबलासारख्या तालवाद्यातसुद्धा सुरेल नादमयता आणली आणि संगीत अभ्यासाच्या जोरावर वेगळं अस्तित्वच या क्षेत्रावर उमटवलं. कला उपासक म्हणजे काय याच उत्तर भाईने आपल्या कर्तृत्वाने दिल. भाई वयाने जरी आज वृद्ध असले तरीही त्यांचा चेहरा आजही प्रसन्न आहे. तर त्यांचा तबल्यावरचा हात आजही तरुण