रस्त्यावर नमाज चालतो, मग पोलीस ठाण्यात जन्माष्टमी बंदी कशाला?

सामना ऑनलाईन। लखनौ

ईदच्या दिवसात रस्त्यावर नमाज पठण करणे जर योग्य आहे तर मग कावडिया यात्रेदरम्यान नाच, गाणे व डिजेवर निर्बंध कसे घालणार? असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. बुधवारी लखनौ येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. अखिलेश सरकारच्या काळात जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली होती, पण जर नमाज पठण कुठेही चालते मग दहीहंडी पोलीस ठाण्यात करण्यापासून कसे रोखणार, असेही ते यावेळी म्हणाले.

‘प्रेरणा जनसंचार एवं शोध संस्थान’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्तर प्रदेशात होणाऱ्या कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे विचार मांडले. कावड यात्रेतील ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी माईक, डीजे आणि इतर वाद्यांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. याबद्दल बोलताना योगींनी आपली मते उपस्थितांसमोर मांडली.

कावड यात्रेच्या काळात ध्वनीप्रदूषण होत असल्याने या काळात माईक, डिजे व इतर वाद्यांवर बंदी घालण्याचे आदेश गेल्या सरकारने दिल्याचे अधिकाऱ्यांनी मला सांगितले. यावर मी अधिकाऱ्यांना एकच विचारले की, ‘मग प्रत्येक ठिकाणी माईकवर बंदी असायला हवी यातून कोणतेही धार्मिक स्थळ वगळता कामा नये. जर हे शक्य असेल तरच अखिलेश सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करा. नाहीतर कावड यात्रा नेहमीसारखीच साजरी होईल’. कावड यात्रा हा मोठा उत्सव आहे. त्यात डमरू, ढोल, चिमटे, बाजा, ही वाद्ये वाजली नाहीत लोकांनी उत्सव साजरा केला नाही तर या यात्रेचा काय उपयोग? असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला.

सर्वधर्मियांना आपले सण-उत्सव साजरा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ख्रिसमस साजरा करा किंवा नमाज पठण करा पण जे काही कराल ते कायद्याच्या चौकटीत राहून करा, असेही योगींनी यावेळी सांगितले.