कोणीतरी आहे तिथे! असं वाटतंय मग हे वाचा

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुशास्त्र विशारद)

२०१० साली माझ्याकडे एक विचित्र केस आली होती. विचित्र ह्यासाठी कारण प्रश्नच तसा विचारला गेला होता. वैशाली माझ्याकडे २०१० च्या ऑगस्टमध्ये आली होती. “मी कुंडलीबद्दल नाही माझ्या घराबद्दल विचारायला आले आहे. तीन वर्ष झाली मला ह्या घरात. घर अतिशय छान आहे. प्रशस्त आहे. पण हॉलमधून किचन मध्ये जाताना जो पॅसेज आहे तिथे एक विचित्र वास येतो. कुबट किंवा काहीतरी जाळल्यासारखा नाहीतर काहीतरी सडल्यासारखा.”

मी म्हटले,” घरी उंदीर वगैरे येतात का ?? किचनमध्ये जाताना वास येतो ना मग पॅसेजच्या बाजूलाच बाथरूम वगैरे आहे का ?”
वैशाली,” हो बाथरूम आहे. पण बाथरूममध्ये हा वास येत नाही. आणि मलाही पहिल्यांदा उंदराचाच संशय आला त्यामुळे आधी उंदीर मारण्याचे सर्व उपाय झाले. उंदीर तर सापडला नाहीच आणि तो वासही गेला नाही. त्यानंतर पेस्ट कंट्रोलवाल्यांनाही बोलावून काम करून घेतले. पण काहीही फायदा झाला नाही.”
“मग किचनमध्ये सिंक वगैरे खराब झालेय का ?” मी म्हटलं.
वैशाली म्हणाली,”ते ही तपासून झालेय. पण हा वास संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यानच येतो आणि ७ वाजून गेल्यानंतर पुन्हा सगळे नॉर्मल होतं जसं काही झालंच नाही”
माझा बापुडा प्रश्न,”मग तुमच्या बिल्डिंगमध्ये काही ड्रेनेज पाईप्स खराब झालेत का?”

वैशालीचा कंट्रोल सुटला,”नाही हो, गेले तीन वर्ष हा वास ठराविक वेळेस घरात पॅसेज मध्येच येतो. सबंध घरात कुठेही हा वास येत नाही. संध्याकाळी ६ आणि ७ च्या दरम्यान हा वास येतो. अत्यंत असह्य असा वास आहे. अर्धवट जळल्यासारखा आणि सडल्यासारखा. पेस्ट कंट्रोल, ड्रेनेज पाईप्स, सिंक सगळे तपासून झालेय. कुठेही प्रोब्लेम नाही. कारण बाकी घरात कुठेही हा वास येत नाही. १ तास हा वास येतंच राहतो आणि मग आपोआप बंद होतो. घरी पाहुणे,मित्र-मंडळी सगळयांना हे आता जाणवले आहे. आता बरेचजण घरी येण्यास पण कचरतात. मलाही मग नको नको ते विचार येतात. घरात मी आणि माझा ७ वर्षांचा मुलगा राहतो आहे. तो शाळेतून घरी संध्याकाळी ५.३० पर्यंत येतो. मला कामावरून घरी पोहोचेपर्यंत ६.३० होतात. तोपर्यंत तो घरी एकटाच असतो त्यामुळे भीती वाटते. धावतपळत घरी पोहोचते. कधी उशीर झाला की खूप टेंशन येतं. घर बदलूही शकत नाही. कारण सध्या माझी तेवढी मिळकत नाही.”
मी म्हटले,”ठीक आहे. तुमची समस्या तर समजली पण ह्यावर जे उपाय आहेत ते करण्याची तयारी आहे का ?”
वैशाली,” तुम्ही सांगा मी ते उपाय करते. कारण घर बदलू तर शकत नाही मग घरात जर काही उपायांनी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर खरेच माझे खूप मोठे टेंशन दूर होईल.”

त्यावर मी म्हटले,” सर्वात आधी तुमच्या घरात अनाहूत शक्तीचे असलेल्या अस्तित्वाच्या शंकेबाबत – मला स्वतःला तरी तसे वाटत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अनाहूत शक्ती आहे असे वाटल्यास बाबा-बूवाच्या मागे जाऊ नको. अगदी साध्या सहज जमतील अशा गोष्टी मी तुला सांगते. तुझ्या सर्व शंका आणि गैरसमज दूर होतील’, असं मी सांगितलं. तिला सांगितलेले हे उपाय पुढील प्रमाणे:

१) घराची फारशी दिवसातून दोन्ही वेळेस खड्या मिठाने पुसून घ्या. (मीठामुळे घरातील नकारात्मक उर्जा निघून जाण्यास मदत होते.) साधा वाटत असला तरी खूप effective उपाय आहे.

२) संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातील प्रत्येकाने पाय स्वछ धुतलेच पाहिजेत.

३) सांजवात घरी झालीच पाहिजे.

४) सर्वात महत्वाचे घरात रामरक्षा संध्याकाळच्या वेळेस म्हटली गेली पाहिजे. आपल्या सर्वच स्तोत्रांमधे अशी शक्ती आहे ज्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा थारा घरात राहत नाही. जर रामरक्षा म्हणता येत नसेल तर बाजारात ह्याची CD मिळते ती संध्याकाळच्या वेळेस सुरू ठेवावी.

५) हनुमान चालीसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचावी आणि वाचताना हनुमान चालीसाचे पाणी तयार करावे. हे पाणी घरातील सर्वांनी प्यायचे आणि उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडावे.

६) दोन – तीन महिन्यातून एकदा तरी सप्तशतीचा पाठ ब्राह्मणांकडून करून घेणे.
हे सगळे करून पहा. खर्चिक उपाय अजिबात नाहीत. नेमाने हे सर्व करून पहा. एक दोन महिन्यात फरक पडावयास हवा. फरक नाही जाणवला तर कळवा मला.”

वैशालीने नीट सगळे लिहून घेतले. मधले बरेच महिने तिचा काही फोन आला नाही. २०१२ च्या डिसेंबर मध्ये वैशालीचा फोन आला. ” भावाची कुंडली तुम्हाला दाखवायची आहे. लग्नाचे योग कधी आहेत ते जाणून घ्यायचे होते.”
म्हटले,”ठीक आहे. ह्या रविवारी जमेल का?”
भेटण्याची वेळ ठरली. तिला घराबद्दल विचारावेसे वाटले पण म्हटले ती येतेच आहे तेंव्हा विचारू.

ठरल्यावेळी वैशाली आली. भावासंदर्भात बोलणे वगैरे झाले. मग तिला घराबद्दल विचारले.
वैशाली हसत हसत म्हणाली,” अहो काय सांगू. इतके वर्ष आम्ही इतके त्रस्त झालो होतो त्या वासाने. कळतच नव्हते वास कुठून येतोय. नको नको त्या शंका मनात घर करू लागल्या होत्या लागल्या होत्या. घर सोडावे लागणार असे वाटत असतानाच तुमचा नंबर माझ्या मैत्रिणीने दिला. तुम्ही दिलेले उपाय केले आणि दीड महिन्यातच वास आपोआप बंद झाला. एवढे साधे वाटणारे उपाय इतके effective असतील असे वाटले नव्हते.”

मी म्हटले,” ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी देलेली अमुल्य अशी भेट आहे. घरात येणारा वास बंद झाला म्हणून उपाय बंद करू नका. सप्तशती पण सूरु आहे ना?” वैशाली,”उपाय आणि बंद ??? नाही अजिबात नाही. हे उपाय सुरू केल्यानंतर आम्हालाही खूप प्रसन्न वाटतेय. मनावरची मरगळ गेली आहे. खूप प्रसन्न वाटतंय. सप्तशती सुरू आहेच. गुरुजींना सांगूनच ठेवले आहे. गेल्या दोन वर्षात तर ह्याची सवय झाली आहे.”, तिने आभारही मानले. पण मी म्हणते यात माझे आभार काय मानायचे? ही तर पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या स्तोत्रांची कमाल आहे. ते नित्यनेमाने केले म्हणजे झाले.

आपली शास्त्र/स्तोत्रं ह्यात खूप ताकद आहे. काही लोकांचा ह्यावर विश्वास नाही. काहींचा विश्वास ठेवायचा की नाही हा संभ्रम आहे. कदाचित उद्या अमेरिकेने सिद्ध करून दाखवले की मग हे लोक त्यावर विश्वास ठेवतील. काहींना ही अंधश्रद्धा वाटू शकेल. पण इथे फार मोठे कुठलेही अवडंबर/शांती/खर्च न सांगता घरच्या घरी करता येणारा,खर्चिक नसलेला उपाय सांगितला आहे आणि ज्या घरात तीन वर्ष सतत त्रास होता तिथे हे उपाय केल्यानंतर गेले दोन वर्ष हा त्रास कमी नव्हे बंद झालेला आहे ह्याची नोंद घ्यावी.

लोकांना असाच शास्त्रांचा आणि स्तोत्रांचा फायदा होवो ही सदिच्छा.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. [email protected]