‘बाहुबली’ हिट झाला कसा?, ‘आयआयएमए’चे विद्यार्थी शोधणार फॉर्म्युला

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

ब्लॉकबास्टर ठरलेला, कोट्यवधींची कमाई करणाऱ्या बाहुबली चित्रपटाच्या निर्मितीचा सखोल अभ्यास ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद’चे विद्यार्थी करणार आहेत. या चित्रपटाचे तंत्र, कला, बॉक्स ऑफिसवर जमवलेला गल्ला यावर केस स्टडी हे विद्यार्थी करणार आहेत.

‘बाहुबली’ या हिंदुस्थानी चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटात सर्वोत्कृष्ट कला, तंत्रज्ञान वापरले असून चित्रपटाने व्यवसायही खूप चांगला केला आहे. बहुतांश चित्रपट हे आशयघन आणि आर्टिस्टिक असतात. पण बॉक्स ऑफिसवर आदळतात, पण ‘बाहुबली’च्या बाबतीत तसे झाले नाही. प्रा.भारतन कंदास्वामी यांनी सांगितले, ‘बाहुबलीवरील केस स्टडी हा चित्रपट व्यवसाय या विषयाचा एक भाग आहे. हा विषय मॅनेजमेंटच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे.’

केस स्टडीमध्ये ‘बाहुबली’मधील तीन गोष्टींचा मागोवा घेतला जाणार आहे. त्या म्हणजे ‘द बिगिनिंग ऍण्ड सिक्वेल, बाहुबली-द कन्क्लुजन आणि सक्सेस मंत्रा.’ हा चित्रपट दिग्दर्शक राजामौली यांनी दिग्दर्शित केला असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाने तब्बल एक हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

हिंदुस्थानी चित्रपट व्यवसायावरही कोर्स
‘बाहुबली’च्या केस स्टडीनंतर ‘आयआयएम’चे विद्यार्थी बिझनेस ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्रीज, स्क्रिप्ट सिलेक्शन ते चित्रपटाचे प्रदर्शन याचादेखील अभ्यास करणार आहेत. चित्रपटासाठी निर्मात्याचा शोध, चित्रपटाचे प्रमोशन, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग हे विषय अभ्यासले जाणार आहेत.