आयआयटी मुंबईचे ‘सोलार हाऊस’ जाणार चीनला

सामना ऑनलाईन, मुंबई

एक घर असे आहे ज्याला वीज लागतच नाही आणि ते स्वत: भविष्यासाठी वीजनिर्मिती करते. पवई येथील आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हे थ्री रूम किचनचे वातानुकूलित घर बनवले आहे. या घरातील उपकरणे ही सौरऊर्जेवर चालतात. आयआयटी मुंबईचा हा एक अभिनव प्रकल्प आहे. चीनमध्ये पुढील वर्षी होणाऱया ‘सोलार डेकॅथलॉन’ स्पर्धेसाठी देशातून या एकमेव प्रकल्पाची निवड झाली आहे. चीनच्या डेझोऊ येथे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. तरुण इंजिनीयर्स आणि आर्किटेक्चर्सचा समावेश असलेल्या आयआयटीतील ‘टीम शुनया’ने हे सोलार हाऊस उभारले आहे. स्पर्धेमध्ये त्यांना अवघ्या १२ दिवसांत असे घर उभारावे लागणार आहे. ‘टीम शुनया’चे हे घर दोन हजार चौरस फूट चटईक्षेत्राचे आहे. त्यात सहा माणसांचे कुटुंब आरामात राहू शकते. आंध्र प्रदेशातील अमरावती भागातील वातावरणानुसार हे घर बनवले गेले आहे.