आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी शोधले डाळिंब तेल काढण्याचे अभिनव तंत्र

सामना ऑनलाईन । मुंबई

डाळिंब हे केवळ खायलाच चांगले नाही तर डाळिंबाच्या बियांमध्ये औषधी तत्त्वेही आहेत. त्या बियांचे तेल हे मधुमेह आणि कर्करोगावर उपचारासाठी जालीम असते असा उल्लेख प्राचीन वेदांमध्येही आहे. डाळिंबाचे तेल काढणे म्हणजे सोपे नाही. पण पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी ते सहजसाध्य करून दाखवले आहे. डाळिंबाचे तेल काढण्याची सोपे आणि अभिनव तंत्र त्यांनी विकसित केले आहे.

तेल काढण्याच्या पारंपरिक तंत्राने डाळिंबाचे तेल काढले जाते, परंतु त्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त तेल कसे मिळेल यावरच भर दिला जातो. त्या प्रयत्नात तेलातील प्रोटीन्सचे प्रमाण कमी होते आणि तेल काढल्यानंतर कचराही जास्त उरतो. आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञ प्रा. अमित अरोरा आणि त्यांच्या टीमने डाळिंब तेल काढण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे जे स्वस्त आणि झीरो कचरा होईल असे आहे. बरोबरच तेलातील प्रोटीन्सचे प्रमाणही उच्च राखते.

डाळिंबाच्या बिया कमी असल्या तरी या नव्या तंत्राने तेल काढता येऊ शकते. अंबाडीच्या तेलाला पर्याय म्हणून डाळिंबाचे तेल उत्तम असून डाळिंब तेल आणि सब्जाचे तेल यामध्ये बरेच साम्य आढळते असे प्रा. अरोरा सांगतात. हिंदुस्थान हा २०१३ पासून डाळिंब तेल निर्यात करणारा जगातील एक प्रमुख देश बनला आहे. आयआयटीच्या नव्या तंत्राचा वापर डाळींब तेल काढण्यासाठी केला तर ते हिंदुस्थानसाठी प्रमुख निर्यात उत्पादन बनेल असा विश्वासही शास्त्र्ाज्ञांनी व्यक्त केला.

असे आहे तंत्र…
डाळिंबाच्या बिया सुकवून त्यांची पावडर करायची. नंतर त्यात सोडियम फॉस्फेट मिसळायचे. ते मिश्रण इन्क्युबेटरमध्ये ४५ डिग्री सेल्सियस तापमानात दहा मिनिटे ठेवायचे. त्यामुळे बियांवरचे आवरण दूर होऊन त्यातून तेल पाझरते. हे मिश्रण ४ ते १६ तास घुसळले गेले की त्यावर शुद्ध, दर्जेदार तेलाचा तवंग येतो. तेच खरे डाळिंबाचे तेल असते.