प्रदूषणापासून वाचण्यासाठी आयआयटीने बनवले ‘नोज फिल्टर’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या प्रदूषणाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून ‘नोज फिल्टर’ तयार केले आहे. फिल्टरची किंमत फक्त १० रुपये असून येत्या काही दिवसांत ते दुकानांमध्ये मिळू शकेल.

आयआयटी आणि नॅनोक्लीन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तरीत्या नोज फिल्टर विकसित केले आहे. नाकपुडय़ांमध्ये हे फिल्टर लावल्यास फिल्टरमुळे हवेतील प्रदूषित घटक शरीरात जाणार नाहीत. त्यामुळे प्रदूषणापासून रक्षण होईल. तसेच नाकाला याचा विशेष त्रासही जाणवत नाही, अशी माहिती नॅनोक्लीनचे सीईओ प्रतीक शर्मा यांनी दिली. आयआयटीचे प्राध्यापक मनजित जस्सल, अश्विनी अग्रवाल आणि संजीव जैन, तुषार व्यास, जतिन केवलानी या विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

सध्या नोजल फिल्टर हे nasofilters.com वर ऑनलाइनच उपलब्ध असेल. लवकरच ते दुकानांत मिळेल. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्टार्टअप राष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे. तसेच कोरियामधील टॉप ५० स्टार्टअप यादीतही नोजल फिल्टरचा समावेश आहे.

१० तास उपकरणाचा वापर
नोजल फिल्टरमुळे पीएम १० धुलिकणांना शरीरात जाण्यापासून १०० टक्के रोखता येईल. २.५ मि.मी. व्यासाचे धुलिकण रोखण्यात हे फिल्टर ९५ टक्के यशस्वी ठरेल. तब्बल ८ ते १० तास हे उपकरण वापरता येईल, असे प्रतीक शर्मा यांनी सांगितले.