पार्ल्यात अतिक्रमणे तोडताना पालिका अधिकाऱयांवर मसाल्याचे पाणी फेकले


सामना प्रतिनिधी । मुंबई

धारावी येथे अतिक्रमणांवर कारवाई करताना मंगळवारी पालिका अभियंत्यांना मारहाण-धक्काबुक्की केल्याची घटना घडली असताना बुधवारी विलेपार्ल्यात ईर्ला नाल्याच्या प्रवाहात येणारी बेकायदा बांधकामे तोडताना पालिका अधिकारी-कर्मचाऱयांवर मसाल्याचे पाणी फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र हा विरोध मोडून पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी 30 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून नालेसफाईच्या कामांबरोबरच नाल्यालगत असणारी व नाल्याच्या प्रवाहात अडथळा ठरणारी बांधकामे तोडण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत ‘के पश्चिम’ विभाग क्षेत्रातील विलेपार्ले पश्चिम परिसरात असणाऱया नेहरूनगरमधल्या नाल्यावर असणारी पाच तर वाढीव स्वरूपाची 25 बांधकामे तोडण्याची कारवाई बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली. या अतिक्रमणांमुळे व अनधिकृत बांधकामांमुळे नाल्याच्या प्रवाहात अडथळा होऊन पावसाच्या वेळी नाल्यालगतचा परिसर जलमय होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असताना बेकायदा बांधकाम असलेल्या रहिवाशांनी कारवाईला विरोध करीत अधिकारी-कर्मचाऱयांवर मसाल्याचे पाणी फेकल्याचा प्रकार घडला, मात्र पालिकेच्या पथकाने या विरोधाला न जुमानता अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई अवघ्या पाच तासांत पूर्ण केल्याची माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.