रोडकटिंगचा मोबदला उपटण्यासाठी भिवंडीत बेकायदा बांधकामांचे टॉवर्स

9

सामना ऑनलाईन | भिवंडी

भिवंडीतील अनधिकृत भंगार गोदामे जमीनदोस्त करण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आले असताना आता भूमाफियांनी रोडकटिंगचा मोबदला उपटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा बांधकामांचे टॉवर उभारण्यास सुरुवात केली आहे. भिवंडी- पारोळ रोडवरील शेलार ते कांबेदरम्यानच्या मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करून भंगाराची दुकाने, तबेले बांधण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी या अवैध बांधकामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी – पारोळ रोडवरील शेलार (नदीनाका) ते कांबे (तळवली नाका) यादरम्यान सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या आशीर्वादाने मोक्याच्या ठिकाणी दुतर्फा अतिक्रमण बांधकाम वाढले आहे. भिवंडी येथील रस्त्याच्या दुतर्फा भंगाराची दुकाने व तबेले बांधण्यात आले आहेत. तर भररस्त्यातच अनधिकृत गाळ्यांचे बांधकामही करण्यात आले आहे. तबेल्यांमधून निघणारे जनावरांचे मलमूत्र थेट रस्त्यांवरून वाहत असून ये-जा करणाऱया वाहनांच्या टायरने हे घाण पाणी पादचाऱयांवर उडत आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे उपअभियंता सचिन धात्रक, सहाय्यक अभियंता अनिल पवार यांनी अक्षरशः दुर्लक्ष केल्याचा आरोप काटई ग्रामपंचायतीचे सदस्य राम मोरघा यांनी केला आहे. तसेच काटई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ठेंगूचापाडा येथे रस्त्याच्या कडेला भूमाफियाने दुमजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामालगत विद्युत ट्रान्सफार्मर व उच्चदाब विद्युत वाहिनी गेलेली आहे. या अवैध बांधकामांवर तसेच रस्त्यावरील अतिक्रमित टपऱयांवर कारवाई करण्याऐवजी बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नोटिसांचे तुणतुणे

सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत या अनधिकृत गाळ्यांना केवळ नोटिसा बजावून वेळ मारून नेली जात आहे. वास्तविक भविष्यात या रस्ता रुंदीकरण होण्याची शक्यता असून सरकारी मोबदला मिळावा यासाठी भूमाफिया अतिक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या