अनधिकृत एलईडी लाईट मासेमारीवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

प्रखर झोतातील एलईडी मासेमारी संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी चर्चा केली. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी । मालवण

अनधिकृत पर्ससीननेट मासेमारीबरोबरच जिल्ह्याच्या सागरी हद्दीत रात्रीच्यावेळी अवैधरीत्या प्रखर झोतातील मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यात मालवण येथील तीन मत्स्य उद्योजकांचा सहभाग असल्याचा आरोप करत आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन मत्स्य अधिकाऱ्यांनी आमदारांना दिले.

मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी येथील सहायक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयास भेट दिली. यावेळी उपतालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुशे, दिलीप घारे, पंकज सादये, बाबी जोगी यांच्यासह पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या अवैधरीत्या प्रखर झोतातील मासेमारी सुरू आहे. या मासेमारीला केंद्र शासनाने बंदी घातली असतानाही मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत मालवणातीलच तीन मत्स्य उद्योजकांकडून प्रखर झोतातील मासेमारी केली जात असून त्यांची नावे आमदार नाईक यांनी सहआयुक्त जाधव यांना दिली. मच्छीमारांनी या तिघांकडूनच प्रखर झोतातील मासेमारी होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी यावेळी केली.

डिसेंबर महिन्यानंतर पर्ससीननेटच्या मासेमारीस बंदी आहे, असे असतानाही आचरा, निवती-वेंगुर्ले येथे सध्या मिनी पर्ससीननेटद्वारे मासेमारी सुरू असल्याचे पारंपरिक मच्छीमारांनी निदर्शनास आणून दिले. यावर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी पंधरवड्यापूर्वी अनधिकृत मिनी पर्ससीननेटच्या साहाय्याने मासेमारी करणार्‍या आठ ते दहा जणांवर कारवाई करण्यात आली असून यावरील दंडात्मक कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. पर्ससीननेटवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र ही मासेमारी थांबत नसल्याने संबंधितांच्या नौका तसेच पर्ससीनच्या जाळ्या सील करण्याची कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यानुसार नांगरून ठेवलेल्या तसेच मासेमारी करताना आढळून आलेल्या पर्ससीन नौकाधारकांच्या नौका तसेच जाळ्या अवरुद्ध करण्याची कार्यवाही केली जाईल असे सहआयुक्त जाधव यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत हायस्पीड, पर्ससीनधारकांकडून अवैधरीत्या मासेमारी करताना मोठ्या प्रमाणात मासळीची लूट केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी मच्छीमारांकडून केल्यानंतरही मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यावर तत्काळ कार्यवाही केली जात नाही. या नौकांना पकडण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक समस्या निर्माण होत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर मत्स्य व्यवसाय विभागाकडे गस्तीसाठी हायस्पीड नौका नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे असे स्पष्ट करण्यात आले. यावर अवैधरीत्या मासेमारी करणार्‍या परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनच्या नौकांना पकडण्यासाठी हायस्पीड नौका उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करावा. यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून हायस्पीड नौका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल, असे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

मत्स्य व्यवसाय कार्यालयासाठी आठ जागा मच्छीमारांनी सुचविल्या होत्या. त्यानुसार शहरातील कन्याशाळा येथील जागेची आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी मत्स्य व्यवसायचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी जागा निश्‍चितीची कार्यवाही तत्काळ करून आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांना केल्या.

अवैध मासेमारी रोखा – वैभव नाईक
मच्छीमार अवैधरीत्या होणार्‍या मासेमारीवर कारवाई होत नसल्यानेच सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. मत्स्य व्यवसायकडून अवैधरीत्या होणार्‍या मासेमारीवर कारवाईची अंमलबजावणी झाल्यास मच्छीमार आक्रमक न होता तुम्हाला सहकार्य करतील. त्यामुळे मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांनी मच्छीमार केवळ भांडण्यासाठी येतात, अशी जी प्रतिमा बनविली आहे ती बदलणे गरजेचे असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

मत्स्य कार्यालय स्थलांतर जागेची पहाणी
मालवण येथील मत्स्य व्यवसाय कार्यालय स्थलांतरसाठी सुचविलेल्या कन्याशाळा येथील इमारतीची पाहणी करण्यात आली. तर जागा निश्‍चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी यावेळी मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांना दिल्या.