राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात मोठी कारवाई; 24 लाखांची दारु जप्त

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. दमण व गोवा येथे उत्पादित होणारी, राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेली तब्बल 24.41 लाखांची दारू वाहनांसह जप्त केली आहे.

जिल्ह्यातील वांबोरी फाटा, नगर-मनमाड हायवेवरील राहुरी येथे 7 लाख 66 हजार 240 रुपयांची राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेली दमन निर्मित दारू व वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर पारनेर कामरगाव व आष्टी तालुक्यातील कारखेल येथे 16 लाख 75 हजार 460 रुपयांची गोवा निर्मित व राज्यात विक्रीला प्रतिबंधित असलेली दारू व तीन वाहने पथकाने जप्त केली आहेत. या प्रकरणी दमन, बीड व नगर येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कारवाई सुरू असून एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली मागील काही दिवसातील ही पहिलीच कारवाई आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी. पी. निकम यांच्या नेतृत्वाखाली संजय सराफ, अण्णासाहेब बनकर, एस. एस. भोसले, सुरज कुसळे, प्रकाश अहिरराव, डी. सी. आवारे, जी. आर. चांदेकर यांच्यासह जवानांचे पथकाने ही कारवाई केली.

अधीक्षक पराग नवलकर म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात बाहेरून येत असलेला अवैध मद्य साठा पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. 13 ठिकाणी सील ठोकण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी शहरात ’ड्रायडे’ घोषित करण्यात आलेला आहे. निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी बाहेरून मागविल्या जाणार्‍या मद्य साठ्यावर आमचे लक्ष असून कारवाई केली जात आहे. दिल्लीगेट येथे शहरात मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे. त्याचा तपास सुरू आहे. येत्या दोन दिवसात कारवाई आणखी कडक केली जाणार असल्याचे अधीक्षक नवलकर यांनी सांगितले.