दारूमाफियांना ‘अच्छे दिन’ तर ‘खाकी’ला लाचखोरीची ‘नशा’ चढल्याची चर्चा

सामना प्रतिनिधी । सफाळे

‘झुम बराबर झुम शराबी..’ च्या तालावर सफाळा व परिसरात हातभट्ट्या धगधगल्या असून गावठी दारूचा महापूर आल्याने येथील दारूमाफियांना मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. खाडीच्या दलदलीत त्यांनी चोरी छुपके भट्ट्याच भट्ट्या लावल्या असून कोणीही यावे आणि गावठी पिऊन जावे असा सारा मामला आहे. कमी पैशात जास्त नशा मिळत असल्याने मद्यपीदेखील गावठीच पिणे पसंत करीत आहेत. या हातभट्ट्या माफियांनी खाडीची तर वाट लावलीच, पण अनेकांच्या संसाराचीदेखील राखरांगोळी केली असून स्वतः मात्र गब्बर बनले आहेत. याकडे सफाळे पोलीस सपशेल कानाडोळा करीत असल्याने खाकीला लाचखोरीची नशा चढली आहे काय, असा सवाल विचारला जात आहे.

सफाळे पूर्वेतही दाट जंगलात तसेच आदिवासी पाड्यांवर गावठी दारू गाळली जाते. ही दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गूळ आणि नवसागर आजूबाजूच्या गावातील दुकानदारांकडून विकत घेतला जातो. काळा गूळ व नवसागरच्या विक्रीला बंदी असूनदेखील हातभट्टीवाल्यांना मात्र हा ‘माल’ व्यवस्थित कसा मिळतो हा प्रश्न नेहमीच येथील रहिवाशांना पडतो. सफाळय़ाचे पोलीस अधिकारी तसेच उत्पादन शुल्क विभागाला याची माहिती असूनही कारवाई होत नाही.

सफाळे गावाच्या दक्षिण भागात खाडीची दलदल असून तेथे घनदाट खारफुटीचे जंगल आहे. त्या ठिकाणी सामान्य माणसाला पोहोचणे शक्य होत नाही. याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक माफियांनी तेथे हातभट्टय़ा लावल्या आहेत. सफाळा पोलीस आणि उत्पादन शुल्क खाते यांचे ‘कॉकटेल’ असल्याने त्यांनी या हातभट्टय़ांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दारूमाफियांनी हातभट्टय़ांसाठी बेसुमार खारफुटीची कत्तलदेखील केली असून मोठमोठी पिंपे, जाळ, नवसागर, काळा गूळ यामुळे या भागात मोठी दुर्गंधीदेखील पसरली आहे. दारू तयार करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे खारफुटी जळून खाक झाली आहे. भट्टय़ांसाठी लागणारे गरम पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने मासे, पशुपक्षी यांना धोका निर्माण झाला आहे.

दापचरीच्या चेकपोस्टवर माफियांच्या टोळ्या
पालघर जिह्यात अनेक पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आले व गेले, पण दमणची बनावट दारू महाराष्ट्रात येण्याची ‘परंपरा’ अजूनही सुरूच आहे. सिल्वासा, खानवेल, दमण येथून मुंबई-अहमदाबादमार्गे खुलेआम ही दारू महाराष्ट्राच्या हद्दीत येत आहे. या दारूच्या वाहतुकीला कोणी ‘ब्रेक’ लावू नये म्हणून दापचरीच्या चेकपोस्टवर माफियांच्या टोळ्या आणि एजंट ठाण मांडून बसतात