गावठी हातभट्टीवर छापा, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

लांजा तालुक्यातील झापडे – पवारवाडी येथील जंगलमय परिसरात गावठी दारु निर्मिती सुरु असतांना अचानक आज उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून गुळ व नवसागरमिश्रीत रसायन, १३० लिटर गावठी हातभट्टीची दारु, २०० लिटर मापाची बॅरल, पाण्याचा पंप आणि इतर साहित्य असा १ लाख ७३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, रत्नागिरीचे पोलिस निरिक्षक गिरीष सासणे यांच्या पथकाने जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय ओक, अपर पोलीस अधिक्षक अमित घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. लांजा झापडे पवारवाडी येथील उंबऱ्याचा पऱ्या येथे २ इसम गावठी दारुची हातभट्टी बांधून दारुची निर्मिती करत होते. पोलीसांनी बाळकृष्ण वामनसे (४९), तुकाराम कुंभार (४८), यांना ताब्यात घेतले आहे. कारवाई केलेल्या पथकामध्ये पोलीस उपनिरिक्षक रवीराज फडणवीस, विष्णू नागले, सुशील पंडीत, राके बागूल, दत्ता कांबळे सहभागी होते.