मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा दारु वाहतूक पकडली

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर होणारी बेकायदा दारुवाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली. दारुची वाहतूक करणाऱ्या दोन मारुती व्हॅन पकडण्यात आल्या. तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत ४ लाख १ हजार ९०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली.

चिपळूण तालुक्यात वालोपे येथे गाड्यांची तपासणी सुरु असताना ओमनी व्हॅनमध्ये ५० बॉक्स सापडले. त्या बॉक्समध्ये गोल्डन एस फाईन व्हिस्कीच्या ६०० सीलबंद बाटल्या सापडल्या. त्याची किंमत ३ लाख ६० हजार रुपये आहे. गाडीसह मुद्देमाल जप्त करुन राज हरचिलकर याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर वालोपे येथे दुसरी एक ओमनी गाडी पकडण्यात आली. या गाडीमध्ये १७ हजार ५०० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु सापडली. वाहनचालक दिपक उत्तेकर याने ही दारु चिपळूण बाजारपेठेत घेऊन जात असल्याचे सांगितले.

या पथकाने सावर्डे कोंडमळा येथील निवाची वाडीमध्ये सुनिल सावर्डेकर याला गोवा बनावटीच्या मद्याची आणि गावठी हातभट्टीची दारु विक्री करत असताना रंगेहात पकडले. त्याच्याकडील २६ हजार ४०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. ही कारवाई भरारी पथकाचे प्रभारी निरिक्षक प्रमोद कांबळे, महेश दंडे, मेहबूब शेख, विनोद गुंजे, विजय हातीसकर, राजेंद्र पालेकर, महादेव चौरे, अर्शद शेख, अतुल वासावे, निनाद सुर्वे, सावळाराम भुवड, संदीप विटेकर सहभागी झाले होते.