देशात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट!

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवरील बंदीचा मुद्दा देशात गाजत असताना देशभरात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशात केवळ १ हजार ७०७ कत्तलखाने वैध असल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. नोंदणीकृत कत्तलखान्यांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असून राज्यात २४९ कत्तलखाने आहेत तर अरुणाचल प्रदेशासह आठ राज्यांत जनावरांची बेकायदा कत्तल सुरू आहे. आठ राज्यांतील एकाही कत्तलखान्याची सरकारदफ्तरी नोंद नसल्याचे केंद्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने सांगितले आहे.

उत्तर प्रदेशात सत्तेवर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करून टाळे ठोकले होते. त्यानंतर देशभरातील अवैध कत्तलकाखान्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे. देशातील वैध कत्तलखान्यांची मध्य प्रदेशातील ‘आरटीआय’ कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती मागविली होती. त्यांना केंद्रीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने माहिती दिली. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार अरुणाचल प्रदेश, चंदिगड, दादरा आणि नगर हवेली, दमण व दीव, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांत सुरू असलेल्या एकाही कत्तलखान्याकडे केंद्र अथवा राज्य सरकारचा परवाना नाही. तसेच त्यांची सरकारकडे नोंदही नाही.