भेंडीबाजारातल्या चिंचोळ्या जागेवर उभा राहतोय अनधिकृत टॉवर

सामना प्रतिनिधी, मुंबई

भेंडीबाजारात अलीकडेच कोसळलेल्या हुसैनी इमारतीची दुर्घटना ताजी असतानाच याच परिसरात चिंचोळ्या जागेवर कथित नऊ मजली अनधिकृत टॉवर उभा राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या इमारतीच्या बांधकामामुळे या ठिकाणच्या इतर जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती कोसळण्याची भीती निर्माण झाली असून हे बांधकाम करणाऱ्यांवर ‘एमआरटीपी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी नोटीस म्हाडाने पालिकेला बजावली आहे.

हुसैनी इमारतीपासून हाकेच्या अंतरावर पायधुनी इस्माईल कर्टे रोडवर सिटी सर्व्हे क्रमांक २५७६ वर या टॉवरचे बांधकाम सुरू आहे. एका टपरीवजा इमारतीच्या चिंचोळय़ा जागेवर हे बांधकाम सुरू असून या बांधकामामुळे सभोवतालच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना हादरे बसत आहेत. या इमारतींना भेगा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा टॉवर पाडण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाची जनहित याचिका तुषार सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून टॉवरच्या बांधकामाची पाहणी
एकीकडे न्यायालयात याबाबत खटला सुरू असताना दुसरीकडे म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेच्या सी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना नोटीस पाठवून कथित अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात ‘एमआरटीपी’ची कारवाई करण्याची सूचना केली आहे. या इमारतीच्या बांधकामाची मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता या ठिकाणी तळ अधिक नऊ मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम चालू असल्याचे आढळून आले. ही इमारत उपकरप्राप्त नसल्याने त्यावर महापालिकेने कारवाई करावी असे म्हाडाने म्हटले आहे.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे महापालिकेला आदेश
याप्रकरणी तुषार सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर आणि न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने संबंधितांविरोधात महापालिकेने कोणती कारवाई केली याबाबतची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत पुढची सुनावणी सुरू व्हायची आहे.