इंधन दरवाढी विरोधात जिल्हा बंद; खामगावात मोर्चा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

इंधन दरवाढीविरोधात विरोधकांनी हिंदुस्थान बंदची हाक दिल्यावरुन आज सोमवारी जिल्हाभरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, शेगाव, चिखली, मेहकर, जळगाव, जामोद, मेहकर, नांदुरा, मोताळा, मलकापूर, संग्रामपूर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यात बंद पाळण्यात आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेससह अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. यावेळी नागरिक, व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने, प्रतिष्ठाणे बंद ठेवून आपला प्रतिसाद दर्शविला. तर खामगाव येथे माजी आमदार सानंदा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला.

खामगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी काँग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून शहरातून मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांनी सायकल चालवली. तर सिलेंडर दुचाकीवर ठेवून दुचाकी लोटत नेऊन व तोंडाला काळ्या फिती लावून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.

शहरातील पेट्रोल पंपावर लावलेल्या नरेंद्र मोदींच्या जाहीरात बॅनरवरील फोटोला हार घालून यावेळी गांधीगिरी करण्यात आली. यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये जावून निवेदन देवून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिलीप सानंदा, अलकादेवी सानंदा, अर्चना टाले, सरस्वती खासने, संतोष टाले, भूषण शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्त मोर्चात सहभागी झाल होते. सकाळपासून शहरातील सर्व दुकाने बंद होती. शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. तर खामगाव आगारातून एकही बस धावली नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.