अभ्यंग आरोग्य : अभ्यंगस्नानाचे महत्त्व

946

दिवाळी जरी चार दिवसांपुरती असली तरी अभ्यंगस्नानाचे महत्त्व हे आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यभराचे असते. आपल्यापैकी प्रत्येकाने आठवड्यातून किमान एकदा तरी अभ्यंगस्नान करायलाच हवे.

आयुर्वेद शास्त्रानुसार आणि हिंदुस्थानी परंपरेनुसार अंगाला तेल लावून जिरवणे आणि उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ करणे याला ‘अभ्यंगस्नान’ असे म्हटले जाते. हिंदुस्थानात वेगवेगळ्या राज्यांत तेलाचे प्रकार त्या त्या वातावरणानुसार बदलतात. मग ते उत्तर प्रदेशात मोहरीचे तेल असो की केरळात खोबरेल तेल आणि महाराष्ट्रात तीळ तेल एवढाच फरक पडतो.

अभ्यंगस्नान ही दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सांगितलेली परिचर्या यामधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रोज सकाळी उठल्यावर तीळ तेल, राईचे तेल, खोबरेल तेल, जे ज्या प्रदेशात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे ते तेल हलक्या हाताने मालीश करून शरीरात जिरवणे म्हणजे अभ्यंग.

अभ्यंगाने जे फायदे होतात ते इतके सुंदर आणि निरोगी ठेवणारे आहेत की ते डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत काम करताना दिसते. कसे ते पाहूया…

 • जरा : म्हातारपण. मग हे म्हातारपण जर अकाली म्हणजे कमी वयात आले तर दूर करते व वयानुसार आलेले म्हातारपण रोखून धरते.
 • श्रम : शारीरीक काम केल्याने आलेला थकवा दूर करते.
 • वातहा : शरीरात वाढलेला वात नियंत्रणात आणते.
 • दृष्टिप्रसाद : दृष्टी स्वच्छ ठेवते. म्हणजेच डोळ्यांची कार्यक्षमता वाढवते.
 • पुष्टी : शरीरातील मांसपेशींना ताकद देते.
 • आयु : आयुष्य वाढवते.
 • स्वप्न : शारीरीक व मानसिक झोप छान लागते.
 • सुत्वक : त्वचा सुकुमार ठेवते. कांती वाढवते.
 • दाढर्यकृत : शरीर दृढ, पिळदार व घट्ट बनवते.

नुसत्या तेल अंगाला लावल्यावर एवढा फायदा होतो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वेळेचा… एवढा वेळ आहे कोणाकडे? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण एक विचार करा. पोटाची भूक लागली तर तुम्ही न थांबता जेवता की नाही… मग दिवसभर हालचाल करणार्‍या शरीराच्या भुकेचे काय? त्याला येणारा कोरडेपणा, दुखणारे सांधे, गळून आलेले शरीर ओरडून सांगत असतं, मला तेल लावा, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला वेळ नाही तर कमीतकमी हात, पाय डोके, कान यांना तरी तेल लावा. त्यानेही फायदा होईल आणि सुट्टीच्या दिवशी अंगाला तेल लावा. वयानुसार अभ्यंगाचा विचार करता लहानपण हे कफाचे, तरुणपण पित्ताचे आणि म्हातारपण वाताचे असते. लहानपणी बाळाचे वाढते वय आणि मांसपेशींचे पोषण होण्यासाठी लाक्षा तेल, बलातेल, बला अश्वगंधा तेल, चंदनबला लाक्षादि तेल, रक्ततेल याचा वापर करतात. तरुणपणी कामाच्या ताणतणावामुळे शरीराला, मांसपेशींना येणारा थकवा दूर करण्यासाठी धान्वंतर तेल, सहचर तेल, दशमूल तेल, श्रीबिल्व तेल, महाविषगर्भ तेल यांचा वापर करावा. म्हातारपणामध्ये वयानुसार कमी होणारी शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी माव तेल, बला तेल, बिल्वादी तेल, नारायणी तेल, महानारायण तेल यांचा वापर करावा. अशा प्रकारे तेलाचा वापर केल्यास प्रत्येक वयामध्ये शरीर शारीरीक व मानसिकरित्या निरोगी राहून आपल्याला साथ देते.

सुगंधी उटणे

रासायनिक अत्तर न वापरता सुगंधी उटणे कसे तयार करायचे ते पाहू. श्वेत चंदन + नागरमोथा + अनंता + मंजिष्ठा + सुगंधी वाळा + आंबेहळद + जटामासी + सुगंधी कपूरकाचरी + बाकुची + मसूर डाळ यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे वनौषधी सुगंधी उटणे. यामध्ये सुगंधी औषधी आहेत. जे शरीराला सुगंधी करतील, पण त्यासोबत ते शरीरात उष्णता तयार करतील. उटण्याचा वापर केल्यास रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. घामाचा वास दूर होतो आणि विविध त्वचाविकारांत चांगला उपयोग होतो. वातावरणातील वाढती उष्णता पाहता सुगंधी उटण्यामध्ये बाकुची व आंबेहळद यांचे प्रमाण इतरांपेक्षा थोडे कमी ठेवावे. – डॉ. दीपक केसरकर, आयुर्वेदतज्ञ

अभ्यंग कुणी टाळावे…?

ज्याला कफविकार झाले आहेत, ज्यांनी वमन व विरेचन घेतले आहे व ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी अभ्यंग करू नये.

उटणे (उद्वर्तन)

अंगास उटणे लावल्याने कफ व मेद कमी होतात. शरीर दृढ व स्थिर होते आणि त्वचा स्वच्छ होते. पूर्वी लोक आंघोळीच्या वेळी बेसनाचे पीठ अथवा मसूरडाळीचे पीठ वापरत होते. हे लावून केलेल्या आंघोळीचा अनुभव व आनंद वेगळाच. याने शरीर तर स्वच्छ होतेच, पण त्यासबोत साबणाने येणारा कोरडेपणा निघून जाऊन शरीराची कांती वाढते.

सुगंधी अभ्यंग तेल

श्वेत चंदन + अनंता + मंजिष्ठा + सुगंधी वाळा + बाकुची हे मिश्रण 250 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशा प्रमाणात घ्यावे. 250 ग्रॅम
मिश्रण + चार लिटर पाणी एकत्र करून 1 लिटर काढा होईपर्यंत उकळवावे. त्यानंतर 1 लिटर काढा + 1 लिटर तीळ तेल मंद गॅसवर शिजवावे. तेल शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करावा आणि त्यामध्ये 100 ग्रॅमची दुसरी पुडी टाकून हलवणे व कपड्याने झाकून ठेवणे. सकाळी गाळून घेणे व अभ्यंगासाठी वापर करणे.

स्नान

 • स्नान सुखोष्ण (सहन होईल इतके गरम) पाण्याने गळ्याखालून केल्याने शक्ती वाढते. परंतु तेच गरम पाणी डोक्यावरून घेतल्याने केसाला व दृष्टीस धक्का बसतो. अर्थात स्नान करताना साध्या पाण्याने डोके भिजवावे व अंगावर गरम पाणी घ्यावे.
 • आंघोळीच्या पाण्यात गुलाब पाकळ्या, केशराच्या काड्या, दूध, कमळाचे फूल हे सर्व थोडावेळ भिजत ठेवल्यास पाण्याला एक वेगळाच रंग आणि गंध तयार होतो. तो शरीराला आणि मनाला आनंद देतो. शरीराचा टवटवीतपणा वाढतो.
आपली प्रतिक्रिया द्या