भाकरी : आरोग्यपूर्ण आणि पौष्टिक

65

>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ  

थंडीचा मुक्काम चांगलाच ऐसपैस झालाय. खरपूस बाजरीच्या भाकरीचे दिवस आहेतच. पण कोणत्याही प्रकारची भाकरी ही नेहमीच आरोग्यपूर्ण आणि पौष्टिक असते. वजन कमी करण्यासाठी, मधुमेह, हृदयरोग इ. अनेक विकारांवर भाकरी-भाजीचा आहार हा रामबाण उपाय ठरतो.  

बाजरी

हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी खातो त्यामुळे हिवाळ्यात बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी व तिळाचे कूट असा आहार घेतो. बाजरी प्रकृतीने उष्ण, पचायला हलकी, चवीला रुचकर व पौष्टिक असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असते. त्यामुळे बाजरीच्या भाकरी जेवणाचे समाधान मिळते, लवकर भूक लागत नाही. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असते. बाजरीची भाकरी ऊर्जादायी असते व यात फोलीक ऑसिड व सत्त्व, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी अनेक जीवनसत्त्वे व खनिजे असतात. बाजरी खाल्ल्याने स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते तर प्रसूती व बाळंतपणात पौष्टिक व दूध तयार होण्यास उपयुक्त ठरते. त्याचबरोबर बाजरीची भाकरी नियमित खाल्ल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते व झोप शांत लागते. रात्री बाजरीची भाकरी व एखादी पालेभाजी आणि लोणी किंवा दही हा अतिशय पौष्टिक व हलका आहार आहे व लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच योग्य असतो. म्हणूनच हिवाळ्यात बाजरीची भाकरी नियमित खावी व त्याबरोबर पालेभाजी व तिळाची चटणी खावी.  

ज्वारी

ज्वारी तुलनेने शीत गुणाची, पचायला हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी असते. पौष्टिक व पोटाला गुणकारी असते. पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. ज्वारीतील खनिजांमुळे रक्ताची कमतरता भरून निघते. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे. ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खावी.  

मिश्र पिठाची भाकरी

ज्वारी, बाजी, नाचणी, उडीद व मेथी यांचे पीठ बनवून मिश्र पिठाची भाकरी करावी. याचा समावेश आहारात वेगळेपण आणतो व आहारात पोषण वाढवते. भाकरी कोणत्याही धान्याची असो, पण ती ऊर्जादायी, पचायला हलकी, पौष्टिक व अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असल्यामुळे पौष्टिक व आरोग्यदायी असते. भाकरीचा समावेश आहारात कोणत्याही वेळी करू शकता. न्याहारी, दूध भाकरी किंवा गूळ, तूप, भाकरी खावी, तर जेवणात भाकरी सोबत एखादी पालेभाजी किंवा वांगी व त्याबरोबर दही किंवा ताक याचा समावेश करावा. रात्रीच्या जेवणात पचायला हलकी असल्यामुळे दूध-भाकरी, भाकरी-पालेभाजी व लोणी खावे. याने पचन सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते व रात्री शांत झोप लागते. म्हणूनच प्रत्येकाने म्हणजेच सर्व वयोगटांतील लोकांनी विविध प्रकारच्या भाकर्‍यांचा समावेश आहारात करावा. त्यात दडलेल्या उपयुक्त पोषणाचा लाभ घ्यावा.  

नाचणी

नाचणी थंड असल्यामुळे तिचा समावेश उन्हाळ्यात केला पाहिजे. नाचणी पचायला हलकी असते व ऊर्जादायी असते. नाचणीत कर्बोदके, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात व मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. यामुळे नाचणीचा समावेश आहारात भाकरी म्हणून खावी किंवा लहान व ज्येष्ठांनी त्याचे सत्त्व खावे.  

तांदळाच्या पिठाची भाकरी

त्वचेच्या समस्येवरील बाजारातील उत्पादने वापरली तर बहुतांश साईड इफेक्ट्स होतात. पण या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे तांदळाच्या पिठाची भाकरी. तांदळाचे पीठ हा एक असा उपाय आहे ज्याची भाकरी नियमित खाल्ल्याने त्वचेचे कोणतेही विकार होत नाहीत. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तांदळाच्या दोन चमचे पिठात पिकलेले अर्धे केळे आणि एक चमचा साय घालून ते मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण डोळ्यांच्या खाली लावल्यास फायदा होईल. तांदळाच्या पिठाची भाकरी खाल्ल्यास मुरुमांवरही फायदा होतो. तांदळाच्या पिठात एक चमचा मध आणि कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुमांवर लावा. काही दिवसांतच फरक जाणवेल. चेहर्‍यावरील टॅनिंग दूर करायचे असेल तरीही तांदळाच्या एक चमचा पिठात लिंबाचा थोडा रस मिसळून त्याची पेस्ट तयार करा. टॅनिंग झालेल्या भागावर ती लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.   

पटणीची भाकरी

तांदळाच्याच भाकरीचा प्रकार. सालासकट, न सडलेल्या तांदळाची ही भाकरी असते. लाल रंगामुळे नाचणीसारखीच दिसते. हिच्यात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. शिवाय सालासकट तांदूळ असल्याने ही भाकरी तंतूयुक्त असते. त्यामुळे पोट साफ राहते.  

उडदाच्या कळणाची भाकरी

अन्य कडधान्यांप्रमाणे उडदामध्येही भरपूर फायबर असते. शरीरातील पचनक्रियेबाबत कसलीही समस्या असेल तर ती उडदातील या तंतूंमुळे कमी होते. शरीरातून मल बाहेर काढून टाकण्याचे काम तंतू करत असतात. त्यामुळे उडदाच्या कळणाची भाकरी नियमित आहारात असायला हवी. नियमित या भाकरीच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पोटात मुरडा होणे अशा समस्या दूर ठेवता येतात. जेवणातील घातक पोषक तत्त्वे फायबर शोषून घेते. उडदाच्या भाकरीमुळे लोह मुबलक प्रमाणात मिळते. शरीरात ऊर्जा वाढवण्याचे काम हे लोह करते. उडदामुळे हाडे मजबूत होतात. त्याबरोबरच उडदाची भाकरी खाल्ल्याने त्वचा चमकदार होते.

[email protected]