संवाद महत्त्वाचा !

parents-child

डॉ. अजित नेरूरकर, मानसोपचारतज्ञ

‘ब्लू व्हेल’ या जीवघेण्या खेळाची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे. या विकृत खेळामुळे मोबाईलचा अतिरेकी वापर करण्याचा मोह आपल्या मुलांना का होतो…?

मुळात ‘ब्लू व्हेल’ अशाप्रकारचा काही खेळच अस्तित्वात नाही. प्लेस्टोअर किंवा ऑनलाईन इंटरनेट हा खेळ सापडत नाही. सोशल मीडियावर काही विकृत माणसं एकत्र येऊन छोटे समूह बनवले जातात. त्यातून मनाने एकाकी मुलांचा शोध घेतला जातो आणि त्यांना विचित्र आव्हाने पूर्ण करण्यास सांगितले जाते.

  • पहाटे साडेचारला उठून भयपट पाहणे.
  • रात्री उंचावर उभे राहणे.
  • घरातील पाळीव प्राण्यांना इजा करणे.
  • स्वतःला जखमा करून घेणे.
  • आत्महत्या हा या आव्हानांचा शेवट आहे.

यातील प्रत्येक आव्हानाचा पुरावा तुम्हाला दिल्या गेलेल्या मेन्टॉरला द्यावा लागतो. रशियाच्या फिलीप बुडेकिन या विकृत मुलाने बायोलॉजिकल वेस्टेज साफ करण्याची जबाबदारी स्वतःच स्वतःच्या खांद्यावर घेऊन अशी विकृत संकल्पना आणली. नुकतेच अंधेरीतल्या एका पंधरा वर्षीय मुलाने या खेळामुळे आत्महत्या केल्याचे वाचले. अर्थात याची चौकशी अजून सुरू आहे. पण त्याच्या आत्महत्येनंतर या भयानक खेळाची चर्चा सुरू झाली. मुलं आज अशाप्रकारच्या खेळांच्या आहारी कसे आणि का जात आहेत हा मोठा चिंतेचा विषय आहे. पालक नोकरी करत असल्याने ते घरी नसतात. मुलं एकटी घरात असतात. घरी बोलायला कोणी नसेल तर ती इंटरनेट, गेम्सकडे आकर्षित होतात आणि त्यातच रमतात. त्यातच त्यांचे जग निर्माण करतात. अशावेळी मुलांना छंद जोपासायला शिकवणे योग्य असते. विशेष म्हणजे ज्यांना मैदानी खेळ आवडतात ती मुलं सहसा अशा प्रकारच्या गेम्सच्या आहारी जात नाहीत. तुमच्याकडे मनोरंजनाचे चांगले चॅनल नसल्यावर मुलं अशा गोष्टी करतात. पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळताना दिसायचे पण अलीकडे काळ बदलला आणि मुलांचे खेळ मोबाईलवर आले. त्यात पालक नोकऱ्या करत असल्याने मुलांसाठी वेळ नसतो आणि त्यातूनच अशाप्रकारतच्या भयानक आणि विकृत खेळांकडे मुलं ओढली जातात. ही मुलं एकलकोंडी, हट्टी होतात. पालकांना उलट उत्तरे देतात. त्यांचे ऐकत नाहीत. एवढेच नाही तर पुढे मोठे झाल्यावर आणखी दुसऱ्या व्यसनांच्या आहारी जातात. त्याची लागण ही लहान वयात झालेली असते. त्यामुळे लहान असतानाच त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे असते.

शाळकरी मुलांना मोबाईलची गरजच नाही

मोबाइल हे इमर्जन्सी साधन आहे. आधी मोबाइल नव्हते तेव्हा माणसे जगतच होती. आपण आपल्यासाठी नको तेवढे चोचले करून ठेवले आहेत. मोबाईलची कोणालाही आवश्यकता नाही. त्यात शाळेतल्या मुलांना मोबाईलची गरजच नाही. घरचा अभ्यास वगैरे मुलांचा जाणून घ्यायचा असेल तर पालकांच्या मोबाईलमधून ते होऊ शकते. त्यासाठी पालकांनी मुलांना मोबाईल हातात देऊ नये. मुलांना व्हिडीओ गेम्स खेळायला आवडत असतील तर वेगळा व्हिडीओ गेम आणून द्यावा.

मुलांशी संवाद साधा

मुलांशी संवाद साधा म्हणजे काय तर मुलांशी तासनतास गप्पा मारायच्या असे नाही. तर पालक घरी गेल्यावर आज दिवस कसा गेला, शाळेत काय केलेस, काय नवीन शिकवले. मुलांना गोष्ट सांगा, त्यांच्याही थोडावेळ बोला. त्याने मुलांना बरे वाटेल. आपली मुलं नेमकी काय करत आहेत हे जाणण्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा. शेवटी मुलांना चांगल्या गोष्टी हातात दिल्या पाहिजेत.

इंटरनेटचा अतिवापर नको

ऑडिक्शन आणि ब्ल्यू व्हेलसारखे खेळ या दोन गोष्टी भिन्न आहेत. ब्लू व्हेलसारखा खेळ म्हणजे रिस्क टेकिंग आहे. त्याचा व्यसनाशी काहीही संबंध नाही. रिस्क टेकिंग हे कोणाला इंप्रेस करण्यासाठी असू शकते. लोकांना आकर्षित करण्यासाठी रिस्क घेतली जाते. या खेळात तुम्हाला डेअर दिली जाते आणि त्याची शेवटची पायरी आत्महत्या असते. म्हणजे ही रिस्क तुम्हाला घ्यायला लागतेय. अशाप्रकारची रिस्क घेणारा मुलगा कोण आहे? हा मुलगा असा आहे ज्याला नॉर्मल रिलेशन नाहीत. तो एकलकोंडा आहे. तो सतत संगणकावर खेळत असतो, मुलांमध्ये मिक्स होत नाही. छोटय़ा-मोठय़ा प्रमाणात रिस्क टेकिंग सगळ्यांकडेच असते, पण त्याला मर्यादा आहेत. आपले आयुष्य एक रिस्कच आहे पण ही रिस्क विकोपाला नेता कामा नये. जी मुले इंटरनेटचा गरजेपेक्षा जास्त वापर करतात ती मुले असे खेळ शोधून काढू शकतात.

मुलांना परिस्थितीची जाण द्या

मुलांना खेळांपासून लांब ठवू नये. कारण त्यांना कुठल्याही गोष्टीपासून वंचित केले की त्यांची उत्कंठा वाढते. पालकांनी मुलांना अर्धा तास व्हिडीओ गेम खेळ मग फुटबॉल खेळ असे सांगायला हवे. टीव्हीला अर्धा तास दे, गाणे शिकायला जा. पुस्तक वाच. कुठली गोष्ट वाईट नसते. त्याचा अतिरेक टाळायला हवा. अशावेळी पालकांनी परिस्थिती हाताळायला हवी. बरेच पालक असतात दहावीची परीक्षा आली की केबल बंद करून टाकतात. यामुळे होतं काय… मुले अभ्यास करत नाहीत आणि आजूबाजूच्या घरात जाऊन टीव्ही बघतात.

काय करायला हवे

  • रात्रीचे वेळेत झोपा. लवकर निजे, लवकर उठे त्यास आयु-आरोग्य लाभे.
  • मोबाईल,इंटरनेटचा वापर मर्यादित करा.
  • मुलांशी पालकांनी संवाद साधा.
  • नकारात्मक विचारांपासून मुलांना दूर ठेवा.
  • मुलांना अन्य खेळांमध्ये गुंतवून ठेवा.