फिटनेस महत्त्वाचा

वेळी अवेळी नाटकाचे दौरे, प्रयोग… शिवाय चांगलंही दिसायलाच हवं… मग अशावेळी फिटनेसकडे लक्ष द्यायलाच हवं.

girish-ook

डॉ.गिरीश ओक….दंड बैठका, सूर्यनमस्कार, आणि प्राणायाम करतो

माझ्या फिटनेसचे रहस्य इट्स अ ग्रेट सिक्रेट. हाहाहा….आनंदी राहतो, चांगल्या गोष्टींचे भरभरून कौतुक करतो, दुसऱयाचे दोष काढत बसत नाही. छान मोकळ्या मनाने ऐकतो. हसू आले की हसतो, रडू आले की रडतो. खरंतर लहानपणापासून वडिलांमुळे व्यायामाची सवय लागली. पण मी जिम्नॅशिअमवाला पटू नाही. मी घरी दंड बैठका, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे मात्र करतो. पण त्याचे असे आहे की नियमित करतो असे नाही तर जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की करतो. ज्या दिवशी वेळ मिळतो त्यादिवशी अर्धा-पाऊणतास नक्कीच व्यायाम करतो.

सगळ्या प्रकारचे सगळं खातो. मांसाहार, शाकाहार दोन्ही आवडीने खातो. दौऱयानिमित्त बाहेर गेल्यावर त्या-त्या ठिकाणचे वैशिष्टय़ मुद्दामहून चाखून बघतो. त्यानिमित्ताने वेगवेगळे पदार्थ माझ्या पोटात गेले. मी कुठल्याही ठिकाणी गेलो की तिथल्या लोकल बाजारात जायला आवडते. तिथल्या लोकल गोष्टी तिथे पाहायला मिळतात. त्याची वेगळी चव असते.. फिटनेसची एक टेंडेंसी असते. तुम्हाला तुमचा आतला आवाज सांगत असतो हे खा हे खाऊ नका. त्यामुळे तो आतला आवाज ऐका.

अभिनय हे माझं प्रोफेशन असल्यामुळे आणि मी ते आनंदाने स्वीकारल्यामुळे त्याच्याबद्दल माझी तक्रार राहिली नाही. वाटेल तेवढा प्रवास, वाटेल तेव्हा खाणे, मिळेल तेव्हा झोप असे विस्कटलेले वेळापत्रक असते पण मी ते मान्य केले आहे. तेव्हा मला त्याचा त्रास कधी झाला नाही. किंवा त्याचा मी कधी बाऊ केला नाही. उलट दौऱयामध्ये पूर्ण मोकळा वेळ मिळतो त्यामुळे मजा येते. मला ते आवडते. तिथे चांगला व्यायाम करायला मिळतो.

nivedita-saraf

निवेदिता सराफ

दोन-दोन तासांनी खायचे

मला फिटनेसची आवड आहे आणि त्यासाठी मी कष्ट घेते. सर्वात पूर्वी मी डॉ.डावरेंकडे जायचे आणि त्याचा मला खूप फायदा झाला होता. त्यावेळी माझं वजन खूप वाढलं होतं. पण त्यांच्याकडे जाऊन मला पहिल्यांदा वजन कमी करता आले. आपल्या चांगल्या सवयी हेच सगळ्याचे उत्तर आहे. तुम्ही काय खाता यापेक्षा कुठल्या वेळेला खाता हे महत्त्वाचे असते. तुम्ही जे खाता त्यावर तुमचे शरीर अवलंबून असते.

पहिले म्हणजे मी खूप फुडी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. कारण शेवटी जे फॅट आहेत ते बर्न केल्याशिवाय ते कमी होणारच नाहीत. पूर्वी मी धावत होते. वर्षातून चार मॅरेथॉन करत होते. आता मी धावत नाही पण चालते. दिवसाला आठ किलोमीटर चालते. आठवडय़ातून चार दिवस चालते. आठवडय़ातून तीनच वेळा कार्ब्स खाते. बाकीचे दिवस मी पूर्णपणे ऑफ कार्ब्स असते. घरात आमटी, भाजी, पोळी असे घरातले खाते. सकाळी मी ओट्सचा डोसा खाल्ला की दुपारी आणि रात्री मीं कार्ब्स घेत नाही. संध्याकाळी साडेसात आठनंतर काहीच खात नाही. रात्री दूध घेऊन झोपते.

शूटिंगला जाताना माझ्या डाएटचे सगळे खाणे घेऊन जाते. कारण मी बाहेरचे काही खात नाही त्यामुळे शूटिंगला जाताना सगळं खाणं घेऊन जावे लागते. दर दोन-तीन तासांनी तुम्ही तोंडात काहीतरी टाकायला हवे. मग चणे दाणे असेल, एखादं फळ असेल, खाकरा असेल. उन्हाळ्यात पाण्याच्या बाटलीत एक काकडीची चकती, थोडंसं आलं, लिंबाची लहान फोड, सैंधव आणि पुदिना टाकायचे आणि ते पाणी प्यायचे. डेटॉक्स मिळतात.

sidhardh-jadhav

 

सिद्धार्थ जाधव

व्यायाम, चांगला आहार

आणि झोप महत्त्वाची

मुळात मी ज्या पद्धतीची नाटकं करतो त्यात खूप ऊर्जा लागते. मग ते विनोदी असो वा गंभीर… ‘लोचा’, ‘जागो मोहन प्यारे’ किंवा आता सुरू असलेले ‘गेला उडत’ ही नाटकं आहेत. यातल्या भूमिकाच अशा आहेत की त्याला खूप सारी एनर्जी लागते. त्यात विनोद आहे आणि लोकांना वेगळ्या पद्धतीने खिळवून ठेवण्याची कला आहे. मी दारू, सिगारेट पीत नाही हेच माझ्या फिटनेसचे मूळ आहे. मी नियमित व्यायाम करतो. शैलेश परूळेकर सरांकडे जातो ते मला ट्रेन करतात. या क्षेत्रात असल्याने दौरे होत असतात आणि थकवाही येतो. लोक अजून विचारतात तुमच्या एनर्जीचे रहस्य काय? मला असे वाटते की, झोकून देण्याची, काम करण्याची जी पद्धत आहे. त्यामुळे एनर्जी आपल्याला मिळत जाते. माझ्यासाठी व्यायाम, चांगला आहार आणि झोप हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

मी मांसाहारासाठी वेडा आहे, दौऱयावर जाताना त्यावर नियंत्रण आणावे लागते. कारण प्रत्येक ठिकाणी पाणी बदलते. व्यायाम हा नाटकादरम्यानच होत असतो. त्यात सगळी धावपळ असते. शक्यतो पूर्वी मी दौऱयावर असताना खूप बाहेर खायचो आता तसे अजिबात नाहीय. आता दही-भात किंवा पालेभाज्या, भुर्जी असे काहीतरी खातो. त्या-त्या शहरात जाऊन तिथल्या गोष्टींचा आस्वाद घेतोच. मी खूप नॉनव्हेजीटेरिअन फुडी आहे. मी कुठल्याही प्रकारचे फास्ट फूड खात नाही. काही पर्यायच नसेल तर मग खावे लागते. पालेभाज्या खाल्ल्या की चेहऱयावर ग्लो येतो, फळं खाल्ल्यावर त्याचा परिणाम चेहऱयावर दिसून येतो. तसेच बाहेरचं खाऊ नका म्हणण्यापेक्षा आपल्याला काय खायला हवे हे कळले पाहिजे. ते करावे. उत्तम डाएट, आराम, झोप आणि मानसिकदृष्टय़ा शांत हे माझ्या फिट राहण्याचे रहस्य आहे.