तुळशीविवाहाचे महत्त्व

सामना ऑनलाईन । मुंबई

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढील चार दिवस तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. ग्रामीण भागात तुळशीला ‘विष्णू-प्रिया’ असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य मानली जाते. काही जण एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशीची पूजा करून पाचव्या दिवशी तिचा विवाह श्रीकृष्णाशी लावला जातो.

या विवाहात तुळस ही वधू, श्रीकृष्ण वर, तर ऊस हा मामा मानला जातो. या दिवशी तुळशीवृदांवनाची रंगरंगोटी त्याला सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढून चारही बाजूने ऊस लावून त्याचा मांडव तयार केला जातो. तुळशीवृदांवनात ऊस, झेंडूची फुले, चिंच, आवळे ठेवले जातात. तुळशीसमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्याकाळी अंतरपाट, मंगळसूत्र, ओटीचे सामान मंगलाष्टके या साहित्यसमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे श्रीकृष्णाशी लग्न लावले जाते.

tulsi-vivah-1

तुळशीविवाह का साजरा करतात ?

जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पुण्यामुळे विष्णुला जालंधराला मारणे कठीण होऊन बसले होते. तेव्हा श्रीकृष्णाने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पतिव्रत्याचा भंग केला. त्यानंतर श्रीकृष्णाने जालंधराचा वध केला. ही सर्व हकिकत वृंदेला समजल्यानंतर तिने श्रीकृष्णाला शाप दिला की तू दगड होशील. वृंदेच्या शापामुळे श्रीकृष्ण दगड झाला. कृष्णाला शाप देऊन वृंदा सती गेली. ती सती गेलेल्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस आणि तिच्या पायाशी दगड होऊन पडलेला श्रीकृष्ण म्हणजे शाळीग्राम. म्हणूनच विष्णुला तुळस प्रिय आहे, अशी एक कथा तुलसीविवाहासंबंधी सांगितली जाते.

त्याशिवाय या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात व चातुर्मास संपतो असा समज आहे. त्याशिवाय घरातील कन्येला श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असाही हेतू यामागे मानला जातो. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून ओळखले जाते. सर्वसाधारणपणे तुळशीच्या लग्नानंतरच हिंदुधर्मीयांच्या विवाहसोहळ्यांची सुरुवात होते.