लता मंगेशकर यांच्या नावाने फसविणाऱ्या महिलेला अटक

गानकोकिळा लता मंगेशकर आणि त्यांचे बंधू संगीतकार हृदयनाथ मंगेशकर

सामना ऑनलाईन, मुंबई

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने अनेक लोकांकडून पैसे उकळणाऱया महिलेला गावदेवी पोलिसांनी नालासोपारा येथून अटक केली. रेवती खरे (५५) असे या महिलेचे नाव असून ती मंगेशकर यांची स्वीय सचिव असल्याचे सांगायची.

पुणे येथील रहिवासी विश्वास देशपांडे यांना या महिलेने लता मंगेशकर यांच्या नावाने बनावट लेटरहेडच्या सहाय्याने गंडविले. लता मंगेशकर यांच्या घरी सत्यनारायण पूजा असून त्यासाठी त्यांनी आपणास आमंत्रित केले आहे असे पत्र देशपांडे यांच्या पुण्यातील घरी आले. यामुळे खूश झालेल्या देशपांडे यांनी हे पत्र आपल्या मित्राला दाखविले. मित्राने हे पत्र लता मंगेशकर यांच्या स्वीय सहायकला पाठविले. त्यावेळी अशी कोणतीच पूजा नसून लेटरहेड बोगस असल्याचे लक्षात आले. यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केला. नालासोपारा येथे राहणारी रेवती ही विधवा महिला लता मंगेशकर यांच्या नावाने लोकांना चुना लावत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याकडे मंगेशकर यांच्या नावाची बोगस लेटरहेड सापडली. लता मंगेशकर यांच्या नावाने मदत निधी जमा करून रेवती हिने पैसेही लाटल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

सोशल मीडियावर टार्गेट शोधायची

लता मंगेशकर फॅन क्लब किंवा इतर सोशल मीडियावरून रेवती आपले टार्गेट शोधायची. लता मंगेशकर यांची स्तुती करणारी पोस्ट टाकणाऱया व्यक्तींशी ती संपर्क करायची. मंगेशकर तुमच्या पोस्टवर खूपच खूश आहेत असे बनावट लेटरहेडवरून पत्र पाठवायची. एकदा का विश्वास संपादन झाला की विविध कारणे सांगून गंडवायची असे तपासातून पुढे आल्याचे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.