कोट्यवधींचा खर्च करूनही बीडवासियांच्या नशिबी अशुद्ध पाणी

2

उदय जोशी, बीड

दुष्काळ उपाययोजनांसाठी पाण्यासारखा पैसा पाण्यात घालूनही शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याचा आरोप बीडवासियांनी केला आहे. सरकारची जबाबदारी केवळ टँकरने पाणी पुरवठा करण्याची नसून शुद्ध पाणी पुरवठा करण्याचीही आहे. तहानलेल्या लोकांना अशुद्ध पाणी पाजण्याचे काम होत असताना कुठे आहे प्रशासन? कुठे आहे यंत्रणा? असा सवाल बीडवासीय उपस्थित करत आहेत.

बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना आधार देण्यासाठी आणि उपाययोजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. एवढा खर्च करूनही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पोहोचतोय का ? यासाठीच प्रशासकीय यंत्रणा आहे, छावणीत भ्रष्ट्राचाराचा तमाशा सुरू आहे, टँकर माफिया धूळफेक करत आहेत. टँकरच्या खेपा कशा वाढतील याचा प्रयत्न सुरू आहे. टँकरने आणलेले पाणी कोठून आणले जात आहे, पाणी कसे आहे हे तपासण्याचे काम कोणाचे ? ज्या पाण्याने अंघोळही करावीशी वाटणार नाही ते पाणी गोरगरीब आणि दुष्काळात हतबल झालेल्या लोकांना दिले जात आहे.

धरणे आणि तळ्यांमधल्या आटलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात थेट विद्युत पंप टाकून पाणी टँकरमध्ये भरले जात आहे. तेच पाणी गावागावात पिण्यासाठी पोहोचले जात आहे. याच गढूळ पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पाणी कसे मिळत आहे, या पेक्षा पाणी मिळत आहे ना यात लोक समाधान मानत असले तरी दुर्गंधी युक्त पाण्यामुळे आजार पसरत आहेत. त्वचेचे आजार डोके वर काढत आहेत. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी बीडवासीय करत आहेत.