‘ती’ला मारण्यासाठी ‘त्या’नं केला ८०० किमीचा प्रवास

सामना ऑनलाईन । बिजिंग
चीनमध्ये एका खासगी कंपनीच्या मालकाने आपल्या महिला ग्राहकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या महिला ग्राहकाला मारहाण करण्यासाठी हा या मालकाने ८०० किमीचा प्रवास केला. ज्या महिलेला मारहाण झाली तिचे नाव शियाओ ली असे आहे. मात्र मारहाण करण्यासाठीचं कारण काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पीडित महिलेनं ऑर्डर केलेले सामान नियोजित वेळी न आल्याबद्दल या महिलेने वेबसाईटवर प्रतिक्रिया दिली होती.
शियाओ ली हिने एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाईवरून काही सामान खरेदी केलं होतं. मात्र सामान तिला वेळेत मिळालं नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शियाओने याबद्दल आपली तक्रार वेबसाईटवर दिली. मात्र या महिलेने केलेली तक्रार कंपनीचा मालक झांग सुझोऊ आवडली नाही. त्यामुळे संतापलेल्या झांग सुझोऊने ८०० किमीचा प्रवास करून शियाओला गाठलं आणि भर रस्त्यात तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. झांग सुझोऊने शियाओला अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या शियाओला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.