आता रोबोट आग विझवणार, दिल्लीत पहिला प्रयोग

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीमध्ये आता लवकरच अग्निशामक दलाच्या जवानांच्या जागी आग विझवताना रोबोट दिसणार आहेत. यामुळेच धूराच्या भीतीवर मात करत आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे. तसेच भीषण आगीमध्ये कधी कधी अग्निशामक दलातील जवान जखमी होण्याचा धोका असतो. तो धोकाही ही कमी होणार आहे. याव्यतिरिक्त, उंच इमारतीला लागणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्नेक लॅडरची खरेदी केली आणार आहे. या शिडीच्या मदतीने सापासारखं इमारतीच्या कोणात्याही भागात पोहचणं शक्य होणार आहे. मात्र सध्या अशाप्रकारची सुविधा देशातील कोणत्याही राज्यात उपलब्ध नाही.

दिल्लीतील अग्निशामक सेवा ही आंतरराष्ट्रीय सेवासुविधांसह सुसज्ज अग्निशामक विभाग असलेली देशातील पहिली एजन्सी असणार आहे. अग्निशामक दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाकडून दोन स्नेक लॅडरची खरेदी केली जात आहे. यापैकी एकाचा खर्च जवळपास ४ कोटी रुपये आहे, तर रोबोटची किंमत ३ कोटी रुपये असणार आहे. तसेच ही व्यवस्था ऑपरेट करण्यासाठी अग्निशामक दलातील जवानांची आवश्यकता नाही. रिमोटनेही हे ऑपरेट करू शकतं. त्यामुळेच भीषण आग किंवा मग सिलेंडरच्या स्फोट झाल्यास आगीवर लवकरात लवकरत नियंत्रण मिळवता येईल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बहुतांश घटनांमध्ये भीषण आग लागल्यास धुरामुळे अधिक त्रास होतो. धुरामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन मोनोऑक्साईडमुळे अनेकदा लोकांचा गुदमरून मृत्यू होतो. तसेच अग्निशमन दलातील जवानांना देखील अनेक अडचणींचा सामना करत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळेच अशा परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबोटला पाठविण्यात येणार आहे.