आंध्र प्रदेशने राखले विजेतेपद

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया (सीएबीआय) आयोजित २४व्या राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या आंध्र प्रदेशने अंतिम फेरीत गुजरातचा ७ विकेटस्नी पराभव करीत विजेतेपद स्वतःकडेच राखले. जेतेपदाबद्दल आंध्र प्रदेशला रोख ५० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या गुजरातला ३० हजार रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात आले.

अंतिम लढतीत आंध्र प्रदेश संघाने ३१.३ षटकांत ३ बाद २५१ अशी मजल मारत विजयासाठीचे आव्हान लीलया पार केले. टी. कृष्णाने ८७ चेंडूंत १०३ धावांची शतकी खेळी करत आंध्रचा विजय साकारला. त्याआधी गुजरात संघाने कर्णधार गणेश मुंडकूर (५७ चेंडूंत ६४) आणि संजय दरवाडा (३३ चेंडूंत ३५) यांच्या खेळींच्या बळावर ९ बाद २५० अशी मजल मारली होती. स्पर्धेतील विजेत्या संघांना हिंदुस्थानचे माजी कर्णधार अजित वाडेकर व माजी क्रिकेटर उमेश कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेला सोनी पिक्चर्स नेटवर्क, इंडसइंड बँक आणि ऍलर्गन यांचा पुरस्कार लाभला.